आपण का जन्मलोय आणि का जगतोय, याचं उत्तर आपल्यालाच शोधायचंय.!


आपण पेपरमध्ये रोज आत्महत्येच्या बातम्या वाचतो. नवविवाहित मुली मानसिक तणावाखाली आत्महत्या करतात. आपण लग्नात भारंभार खर्च करत असतो, पण विवाहापूर्वी मनाचे संतुलन कसे साधावे, आलेल्या परिस्थितीला कसे सामोरे जावे, याचे ज्ञान लाडाकोडात वाढलेल्या मुलामुलींना आपण पालक देत नाही.


गरज असेल तेव्हा आईबाबा आणि इतर कुटुंबीय माझ्या सोबत आहेत असा विश्वास मुलामुलींना वाटत नाही. तडजोड, स्विकार या गोष्टी बरोबर असतीलही, पण मर्यादेबाहेर गेल्यावर आपण आपल्या मुलांना पाठींबा दिला पाहिजे.

लाडाकोडात वाढलेल्या मुलींनी लगेचच प्रौढपणे वागावे, कुठल्याही परिस्थितीत मनाचे संतुलन ठेवावे ही अपेक्षा मुळातच चुकीची आहे. त्यांचा माणूस असण्याचा हक्क हिरावून घ्यायचा हक्क कोणालाही नाही..! नापास मुलंमुली आत्महत्या का करतात ? कारण आपण त्यांना अपयश पचवायला शिकवलं नाही.

पास होण्याचं महत्त्व आणि आवश्यकता मुलांच्या मनावर आईवडील इतकी बिंबवत असतात, की नापास हा शब्द नुसता ऐकला तरी मुलं घाबरतात. ही समाज आणि आईवडील म्हणून आपली चूक आहे.

खरंतर दहावी, बारावीच्या मार्कावर आयुष्याची कमान उभी नसतेच, पण समाजाने त्याचा बागुलबुवा करून ठेवला आहे. कारण समाजात जास्त मार्क मिळविणाऱ्यांचे स्थान वरचे, अशी मानसिकता आहे. ती पूसून काढायला हवी.

आपल्या शिक्षणपद्धतीत बदल करायला हवेत. या शिक्षणपद्धतीच्या चिंधड्या उडवणाऱ्या या आत्महत्या अजूनही आपल्याला जागे करत नाहीत हे फार दुर्दैवाचे आहे. जास्तीत जास्त मार्क मिळविण्यासाठी मुलांची कुतरओढ होते. मुलांवर मार्काचे किती दडपण येते.?

दुसऱ्यांना ते मिळतंय म्हणून रडायचं, मला मिळत नाही म्हणून रडायचं. जगात रोज असंख्य मरण भोगत जगणारी माणसं आपण का दाखवत नाही मुलांना, सुरक्षित वातावरणात वाढवावे पण जगाची, घरातील अडचणी, व्यवहार यांची तोंडओळख तरी मुलांना करून द्यायला हवी.

आपण रोज पहाणाऱ्या सुर्याला ग्रहण लागतं, म्हणून सुर्य दुसऱ्या दिवशी उगवायचा थांबत नाही. अपयश, दु:ख पचवून जगण्यात जीवनाची यशस्विता आहे, हे मुलांना शिकवायला हवे.

यशस्वी लोकांच्या कथा अभ्यासक्रमात असतातच, पण त्या यशाच्या आधी आलेलं अपयश, त्या व्यक्तीने आयुष्यात केलेला संघर्ष हेही मुलांना माहिती व्हायला हवे. यासाठी मुलांना वेळ द्यायचा हवा, त्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करायला हवा.

सगळ्यात महत्त्वाचे... म्हणजे जगण्याची विविध कौशल्ये आपल्यामध्ये रुजवायला हवीत. 'जगणं' आणि 'जगवणं' दोन्हीही सुंदर आहे, हे सतत आजूबाजूच्या माणसांनी जाणवून दिलं पाहिजे.

एका घरात राहून माणसं एकमेकांचा दुस्वास करतात. एकमेकांना टोमणे मारत रहातात. मत्सर करतात, एकमेकांचे आयुष्य नरक करून टाकतात. मग असं एखादं वेड कोकरु या लाटांना तोंड देऊ शकत नाही अन् असला वेडेपणा करुन बसते.

सर्वांनी हे लक्षात घ्यायला हवे की, 'डिप्रेशन' हा कमकुवतपणा नाही, तो वेळीच बरा होणारा आजार आहे. वेळीच केलेल्या उपचारांनी तो बरा होतोच. हे सतत आजूबाजूच्या नाजूक मनस्थितीतील माणसांना सांगत रहायला हवे.

आपण समुद्रालगतच्या दुर्गासारखं असायला हवे. आयुष्यात मनाविरुध्द अंगावर येणाऱ्या लाटांना सतत निश्र्चयाच्या प्रयत्नांच्या जमिनीवर घट्ट पाय रोवून तोंड देत राहिले पाहिजे. आपण का जन्मलो आहोत आणि का जगत आहोत याचं उत्तर आपल्या आपण शोधायचं आहे आणि ठरवायचं आहे..!

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !