भाषा हा शब्द संस्कृतमधील 'भाष्' या धातूपासून आला आहे. विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा. ती मौखिक, लिखित असते. आपण एकमेकांशी सहज जोडले शकतो ते या भाषेमुळे..!
नुकतीच निवडणूक झाली, प्रचाराचा धुरळा उडाला. त्यात भाषेचाही धुरळा मानमर्यादा ओलांडून गेल्या. 'घरात घुसून मारु,मत दिले नाही तर अद्दल घडवू, तुमच्या विभागाला जिल्ह्याला निधी देणार नाही (जणू पदरचे पैसे देणार असल्याचा आव), मुलींनी सासरी जावे, बायकांनी घरात जाऊन मुल सांभाळा, भाकरी बडवा...' असे कितीतरी..
बरं हे बोलणारी माणसं अशिक्षित नाहीत बरं...चांगली मोठ्या पदावर कार्यरत आहेत. पण सत्तेचा उन्माद माणसाला जनावरं करत असावा. इतिहासावर भाष्य करताना ह्या व्यक्ती काहीही माहिती नसताना बोलत असतात. इतिहास विशेषतः छत्रपतींबद्दल बोलताना भान ठेवायला हवे.
पण यांच्या डोक्यात सत्ता इतकी भिनलेली आहे, की आपली भाषा कशी असावी याचे भान राहिले नाही. हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, या सुसंस्कृत नेत्यांच्या परंपरेतील आहे.
बोलणं शांत, सावकाश, माधुर्य असलेलं असावे. नम्रपणे जी गोष्ट तुम्ही समोरच्याला सांगाल ती तो ऐकून घेईल आणि उत्तम प्रतिसादही देईल. टाटा यांना बोलताना ऐका ऋजुता ही वागण्या बोलण्यात हवी.
तुम्ही स्थावर मालमत्तेचे धनी असण्यापेक्षा नम्र, सुसंस्कृत विचारांचे धनी असाल तर लोकप्रिय व्हाल. नेते निधी उपलब्ध करून देतात ते त्यांचे काम असते म्हणून. राजकारणाला समाजकारणाची आणि समाजकारणाला नम्रता, शांतपणे दुसऱ्याचे ऐकून घेण्याची जोड असेल तर खरंच तुम्ही लोकप्रिय व्हाल.
भाषा ही परस्परांशी संबंध जोडणारा साकव आहे तो तुम्हीं कसा वापरता यावर तुमचे व्यक्तिमत्त्व ठरत असते. नाहीतर आज सत्तेवर आहात आणि काळ तुम्हाला कुठे नेऊन ठेवेल हे सांगता येत नाही. मुखातून बाहेर पडणारा शब्द ऐकावासा वाटू दे. बस्स इतकंच..!
- स्वप्नजाराजे घाटगे (कोल्हापूर)