एकदा पु. ल. देशपांडे म्हणाले होते, 'अंधाचं अंधपण हा खरा प्रश्न नाही, पण डोळसांनी अंधांच्या प्रश्नांकडे केलेली डोळेझाक हा खरा प्रश्न आहे..!'
आपल्या निसर्गाच्या अंगणात विविध रंगांची उधळण केली आहे. सागराच्या भरती, ओहोटीच्या लाटा, नदीचे संथ वाहणारे पाणी पहाणे हा केवळ अवर्णनीय आनंद आहे.
डोळ्यात दाटलेल्या काळ्याकुट्ट अंधारातून उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या व्यक्तींना दृष्टीदानाच्या माध्यमातून हे जग सुंदर आहे, ह्याची प्रचिती देण्याची प्रेरणा देणारा हा दिवस.
आपण केलेल्या नेत्रदानामुळे कोणाच्या तरी आयुष्यात एक नवी दिशा, एक नवी कलाटणी मिळू शकते. आपल्या देशात अंध व्यक्तींचे प्रमाण लक्षणीय आहे. ज्या अंधांच्या डोळ्याचा पारदर्शक भाग म्हणजे कार्निया सफेद झाला आहे, अशा लोकांना दुसऱ्या डोळस व्यक्ती दृष्टीदान करू शकतात.
मानवाच्या प्रत्येक अवयवाचा दुसऱ्या व्यक्तीला उपयोग होऊ शकतो. नेत्रदान करु इच्छिणाऱ्या व्यक्तीने नेत्रदान पेढीकडे आपली नेत्रदानाची इच्छा लिखित स्वरूपात दिलेली असते. मृत व्यक्तीने नेत्रदान संकल्प केलेला आहे हे कळण्याकरता नेत्रपेढीने दिलेले मानपत्र घरात सर्वांना दाखवून ठेवावे.
मृत्यूनंतर मृताचे डोळे चार तासांच्या आत ही नेत्रदानाची प्रक्रिया करावी लागते. मृत्यूनंतर मृताचे डोळे उघडे असतील तर ते आपल्या हाताने हळुवार बंद करावे. डोळे कोरडे पडू नयेत यासाठी ओला कापूस डोळ्यावर ठेवावा. त्वरीत डॉक्टरांना कळवावे.
डॉक्टर १५ मिनिटांत मृताचे डोळे काढून घेतात, डोळ्यांच्या पापण्या बंद करतात, यामुळे मृतदेह वेगळा दिसत नाही. आता नेत्रदान कोण करु शकते.? तर ज्यांचे डोळे चांगले आहेत, ज्यांचा कार्निया पारदर्शक आहे, अशा कोणत्याही व्यक्तीला नेत्रदान तथा दृष्टीदान करता येते.
आणखी एक महत्वाचे.. एखाद्या व्यक्तीला मध्येच काही कारणांमुळे अंधत्व आले असेल पण त्यांचा कार्निया पारदर्शक आहे, अशा अंध व्यक्तींसुध्दा मरणोत्तर नेत्रदान करू शकते. कोणत्याही व्यक्तीच्या वयाचे नेत्रदान कोणत्याही वयाच्या व्यक्तींना चालते.
कार्निया घेतल्यानंतर तो सुरक्षित केमिकलमध्ये ठेवला जातो. मंडळी, खरंतर आपलं स्वतःचं इथे काही नसतं जे असतं ते प्रेम, उरतं ते फक्त प्रेम. आपण एक चांगली आठवण म्हणून रहायचं असेल तर नेत्रदान, अवयव दान हे संकल्प केले पाहिजेत.
अर्थातच मी आणि माझी मोठी लेक प्रियंका यांनी नेत्रदान संकल्प केला आहे, आणि तुम्ही.? दोस्तों, जीने की कुछ तो वजह होनी चाहिए, वादे ना सही जी, हमें किसी की यादोंमे तो रहना चाहिए...!
- स्वप्नजाराजे घाटगे (कोल्हापूर)