दिनांक १२ जून, अर्थातच बाल कामगार विरोधी दिन. देशात अजूनही आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी देशातील कोवळी कोवळी पाने या कष्टाच्या जात्यात भरडली जात आहेत. श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत. आणि गरीब आणखी गरीब.
देश अति सामाजिक विषमतेकडे गेला आहे. शिक्षणापासून वंचित ही पिढी म्हणजे देशाला काळजीत टाकणारे भविष्य आहे. यातूनच देशात वाईट प्रवृत्ती वाढेल आणि ते देशाच्या प्रगतीसाठी फारच वाईट आहे.
अलक : एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांसाठी बालदिनानिमित्त एका हॉटेलमध्ये पार्टी दिली. मुलं खूप आनंदाने जल्लोष करत होती. हॉटेलच्या भटारखान्याच्या मोरीत एक १२ वर्षाचा मुलगा झेपत नसताना मोठी मोठी भांडी घासत होता..
एकीकडे पोटाच्या भुकेसाठी ते लेकरु जीव तोडून राबत होतं. आणि दुसरीडके त्याच हॉटेलच्या दारावर एक बोर्ड लटकलेला होता. त्या बोर्डवर लिहलं होतं, आमच्या इथे बालकामगार काम करत नाहीत.
जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त एक संकल्प करुया.. कुठेही लहान मुलांचं बालपण कोमेजून जाणार नाही, याची खबरदारी घेऊ आणि आपण आपल्या घरसख्यांच्या मुलांना आर्थिक मदत करून शिक्षणासाठी प्रोत्साहित करत राहू..
- स्वप्नजाराजे घाटगे (कोल्हापूर)