हल्ली बऱ्याच महिला केवळ महिला आरक्षण आहे म्हणून, ते पद घरातच रहायला हवं म्हणून राजकारणात प्रवेश करतात. सत्ता मिळवण्यासाठी मनाचे सामर्थ्य लागते. त्याहून अधिक ताकद आपण लोकांना दिलेला शब्द पाळण्यात आणि सत्तेपासून दूर राहून समाजसेवेत आयुष्य घालवण्यात लागते.
आता स्त्रियांना संधी मिळतेय. तिथे त्या आत्मविश्वासाने वावरत आहेत. काहीजणी मात्र नवऱ्याने सांगितले म्हणूनच उभ्या रहातात. त्या पदाला न्याय देण्यासाठी किंवा नागरिकांच्या अडचणी सोडवण्यात किती सहभागी असतात हा वेगळाचं आभ्यासाचा मुद्दा. कारण पदावर त्या असल्या तरी त्यांचे पतीच कारभारी असतात असं दिसून येतं.
आता आरक्षणामुळे स्त्रीला राजकारणरुपी समाजसेवेची दारे उघडली आहेत. हे ठराविक वर्गाच्या महिलांचे (उदा. घराणेशाही) असे न समजता समाजातील जबाबदार, बुध्दीमान स्त्रीयांनी याचा विचार करायला हवा. राजकारणात सचोटीने वागून तिला जरब निर्माण करता आली पाहिजे.
महिलांसाठी शासनाच्या अनेक लाभदायी योजना असतात. त्याविषयी आणि रस्ते विकास, विविध प्रकल्प या योजनांचा अभ्यास करुन लोकांपर्यत, तळागाळातील महिलापर्यंत पोहचवण्यासाठी झटले पाहिजे.
पवार साहेब महिला आरक्षण पास केले तेव्हा म्हणाले होते, भारतीय स्त्री नियोजनात प्रथम स्थानावर आहे. त्यामुळे स्त्रिया राजकारणात आल्या तर कारभारात नेटकेपण येईल. आपण ज्यांच्यासाठी सत्ता स्विकारली त्या नागरिकांच्या प्रश्नांचा स्त्रिया जिव्हाळाने विचार करतील.
हे अतिशय खरं आहे, पण अभ्यासपूर्ण राजकारण ही काळाची आवश्यकता आहे. नुसत्या पतीच्या सांगण्यावरुन राजकारणात प्रवेश केला तरी स्वतःचा वेगळा ठसा.. स्वतःचीही वेगळी ओळख निर्माण करणं, जनसंपर्क ठेवणे, सत्तेचा अंहकार न बाळगता सर्वांशीच प्रेमाने, माणुसकीने वागणे, ही पथ्ये स्त्रियांनीच काय पुरुषांनीही पाळली पाहिजेत.
घराणेशाहीने पद मिळेल, पण ओळख स्वतःची स्वतः निर्माण करावी लागेल. कुठल्याही पक्षाचे सभासदत्व घेताना त्या पक्षाची ध्येयधोरणे पहायला हवीत. समाजाला आता निकोप प्रांजळ राजकारणी लोकांची गरज आहे. शब्द पाळणं हे व्रत आहे. ते जमायला हवं.
यासाठीच सर्व महिलांनी मतदानाचा पवित्र अधिकार निभवायला हवा. कारण स्त्रीला भलेबुरे, उपयोगी अनुपयोगी कळते. बघा धान्यातील खडे ती कचऱ्यातच टाकते. तसं मतदान करतान महिला सुरक्षा, बेरोजगार, महागाई हे विचारात घेऊन मतदान करूया.
पुढच्या पिढीला आपण काय ठेवणार आहोत याची जाणीव स्वतःला झाली पाहिजे. तेव्हा नीरक्षीरविवेकाने मतदान करा, यात स्वतःचा विचार आणि आत्मसन्मान जागा ठेवा. कित्येक स्त्रियांनी राजकारणात स्वतःची अशी ओळख निर्माण केली आहेच. त्यांचा ठसा समाजमनावर अजूनही आहे.
समतेच्या या युगात आपण माणूस आहोत. अन् माणसांने माणसांशी माणसासम वागणे हे सतत ध्यानात ठेवायला हवं. आपल्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते निर्माण करणं, त्यांना जपणं, हेच राजकारणी माणूस असणाऱ्या व्यक्तींची ओळख असायला हवी.
स्त्रियांनी राजकारणात यायला हवंच, पण ते अभ्यास आणि आत्मविश्वासाची ढाल घेऊन. याबरोबरच प्रत्येकाचा स्वतःचा एक पक्ष असतो. तो असतो आत्मसन्मानाचा, स्त्री-पुरुषांनी ही स्वप्रतिष्ठा मात्र सांभाळली पाहिजे. दुसऱ्यांनी ती सांभाळावी, असे व्यक्तीत्व मात्र तयार करायला हवे.
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)