अहमदनगर शहर स्थापना दिनानिमित्त 'स्नेहबंध'चा अनोखा उपक्रम


अहमदनगर - अहमदनगर शहराचा मंगळवारी ५३४ वा स्थापना दिन उत्साहात साजरा झाला. यानिमित्त जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांना नवीन जिल्हाधिकारी इमारतीची प्रतिमा स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी भेट दिली.

२८ मे १४९० रोजी 'कोटबाग निजाम' हा राजवाडा बांधून नगरची स्थापना झाली. मलिक अहमदशहा याने १४९० मध्ये सीना नदीकाठी वसाहत स्थापन केली. तेथेच अहमदनगर वसण्यास सुरवात झाली. अहमदशहाच्या नावावरूनच 'अहमदनगर' हे नाव पडले. शहराचा स्थापना दिन साजरा करणारे अहमदनगर हे एकमेव शहर आहे.

अहमदनगर शहराच्या स्थापना दिनानिमित्त स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे शहरातील ऐतिहासिक वास्तूंची प्रतिमा दरवर्षी भेट देतात. आजच्या स्थापना दिनानिमित्त शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीची प्रतिमा जिल्हाधिकारी सालिमठ यांना भेट दिली.

ही प्रतिमा पाहून जिल्हाधिकारी यांनी डॉ. शिंदे यांच्या फोटोग्राफीचे कौतुक केले. डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, शहरात ब्रिटीश काळापासून लष्करी महत्व आहे. वाहन संशोधन विकास केंद्र, रणगाडा दल, खारे-कर्जुने (केके रेंज) हे युद्धसराव आणि प्रात्यक्षिक केंद्र अशा अनेक महत्त्वाच्या संस्था शहर व परिसरात आहेत.

दीडशे वर्षापेक्षा जुने संपूर्ण दगडी बांधकाम असलेले ह्यूम मेमोरियल चर्च, रुग्णसेवेला समर्पित असलेलं बूथ हॉस्पिटल, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे…’ अशी घोषणा असलेले बाळ गंगाधर टिळकांचे भाषण झाले, ती इमारत कंपनी, असा मोठा इतिहासाचा वारसा अहमदनगरला आहे. तो जपण्याचं काम करत आहे.

ऐतिहासिक वास्तुंची प्रतिमा भेट देण्याचा उपक्रम कौतुकास्पद - जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ म्हणाले, २८ मे १४९० ला स्थापन झालेलं.. काना मात्रा वेलांटी नसलेलं सरळ माणसाचं सरळ शहर म्हणजे अहमदनगर. या शहराचा ऐतिहासिक वारसा जतन व संवर्धन करण्यासाठी डॉ. उद्धव शिंदे हे शहर व परिसरातील ऐतिहासिक वास्तुंची प्रतिमा भेट देऊन तो वारसा जपत आहेत.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !