'द परस्युएट ऑफ हॅपिनेस' : एक संयमशील जीवन प्रवास


मानवाने भौतिक प्रगती केली, या प्रगतीमुळे मानवाचे जीवन सोयीस्कर झाले पण या विकासामुळे ज्या सोयीसुविधा निर्माण झाल्या त्या काही ठराविक लोकांपर्यंतचं पोहचल्या. उरलेल्या लोकांना मात्र या सुखसुविधा मिळवण्यासाठी खूप झगडावे लागते.

या चित्रपटातील नायक 'ख्रिस गार्डनर'ही आपल्यासाठी अन आपल्या कुटंबासाठी असेच एक स्वप्न पाहत आहे, पण त्याच्याशी नियती कशाप्रकारे पाठशिवणीचा खेळ खेळते आणि तो त्या परिस्थितीला कसा पुरून उरतो याची कथा म्हणजेच हा चित्रपट होय.

जीवनात जर यशस्वी व्हायचे असेल तर कष्ट करण्याची सचोटी, कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीशी झगडण्याची वृत्ती तुमच्यात असायला हवी. अन हे जर करायचे असेल तर तुमच्यात एक ठहराव आणि संयम असायला हवा, हा मंत्र अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे.

१९८१ साली अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को येथे राहणारा 'ख्रिस गार्डनर' हा आपल्या बायको 'लिंडा' आणि मुलगा 'ख्रिस्तोफर' सोबत राहत असतो. तो अधिक नफ्यासाठी आपली आयुष्यभराची कमाई त्या काळात वैद्यकीय क्षेत्रात नव्याने आलेल्या 'पोर्टेबल बोनडेन्सिटी स्कॅनर'वर लावतो.

पण दुसऱ्या मशिनच्या मानाने ती कुचकामी ठरते, अन साहजिकच 'ख्रिस'चे दिवाळे निघते. आयुष्याची सोनेरी स्वप्न पाहिलेल्या 'लिंडा'चा मात्र या सगळ्या परिस्थितीत भ्रमनिरास होतो. आणि तिला संसार चालविण्यासाठी स्वतः दोन-दोन शिफ्टमध्ये काम करावे लागते.

त्यामुळेच त्या दोघांमध्ये खटके उडत असतात. एव्हाना 'ख्रिस्तोफर'कडे लक्ष द्यायलाही त्यांच्याकडे वेळ नसतो. त्यातच 'ख्रिस' एकदा रस्त्यावरून जात असताना त्याला एक खूप चांगली कार दिसते, अन त्यातून एक सुटाबुटातील, चेहऱ्यावर प्रसन्न भाव असणारी एक व्यक्ती बाहेर पडते.

त्याच्याकडे पाहून 'ख्रिस'ला राहवत नाही, तो त्याला तो कसा श्रीमंत आहे याबद्दल विचारतो, तेव्हा ती व्यक्ती त्याला जवळच असलेली इमारत दाखवतो अन म्हणतो, मी तिथे 'स्टॉक ब्रोकर' आहे. ती व्यक्ती, ती इमारत अन त्या इमारतीतून बाहेर पडणारी प्रसन्न चेहऱ्याची माणसे यात त्याला एक सकारात्मकता जाणवते.

'ख्रिस' हा 'लिंडा'ला आपण 'स्टॉक ब्रोकर' बनणार आहे, असे सांगतो. त्यामुळे त्यांच्यात अजूनच बेवनाब निर्माण होतो. आर्थिक तंगीला कंटाळलेली लिंडा 'ख्रिस'पासून विभक्त होते. 'ख्रिस'चा आपल्या मुलावर खूप जीव असतो, त्यामुळे तो 'ख्रिस्तोफर'ला 'लिंडा'कडे सोपवण्यास देण्यास नकार देतो. पण त्याचदरम्यान 'लिंडा'ला युरोपमध्ये काम मिळते, म्हणून ती 'ख्रिस्तोफर'ला 'ख्रिस'जवळ सोडून जाते.

इथून पुढे सुरु होतो 'ख्रिस' आणि 'ख्रिस्तोफर' याचा नशिबाला हुलकावणी देऊन यशस्वी होण्याचा अविश्वनीय असा प्रवास. साहजिकच हा प्रवास पडद्यावर पाहणे जास्त संयुक्तिक राहिल, कारण त्यातील रोमांच आणि भावनिकता शब्दांच्या भाषेपेक्षा चित्रभाषेत उठावदार दिसतील.

जगण्याच्या प्रवाहात जर सगळ्याच गोष्टी आपल्या विरोधात जात असतील, तर आपण त्याला नियती मानून त्या परिस्थितीपुढे गुडघे टेकतो. पण काही लोक मात्र ते स्वीकारत नाहीत. त्याविरुद्ध झगडतात आणि आपल्यासाठी एक चांगली परिस्थिती अन आपले एक चांगले भविष्य आपल्या स्वकर्तृत्वाने तयार करतात.

अशा व्यक्ती समाजासाठी आदर्श, मार्गदर्शक ठरतात. याचे कारण त्यांच्यात असलेली संयमी वृत्ती हेच असते. कोणत्याच रुळलेल्या वाटेने ना जाता, कचखाऊ दृष्टीकोन न बाळगता ते एक नवी वेगळीच वाट निर्माण करतात. 'ख्रिस'चाही प्रवास असाच संयत आहे, त्यामुळे तो मनाला भावतो व आपल्या वाट चुकलेल्या जगण्याला दिशा देतो.

- सचिन धोत्रे (दैठणे गुंजाळ, अहमदनगर)

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !