आज २४ मे जागतिक बंधू दिवस. भावाबद्दल प्रेम, आपुलकी, माया, ओढ दाखविण्याचा दिवस म्हणे.. खरंतर हा दिवस अमेरिकेतील अलाबामा येथील सी. डॅनियल रोडस नामक व्यक्तीने २४ मे रोजी साजरा करण्यास चालू केला. त्या नंतर अमेरिकेत हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला.
अलिकडे भारतातही हे दिवस साजरे होतात. 'भाऊ' हा शब्द उलट केला तर 'उभा' असा होतो. जो आपल्यामागे सुखदुःखाच्या प्रसंगी पहाडासारखा उभा रहातो तो 'भाऊ' असतो. लहानपणीच्या लुटूपूटीच्या भांडणातून, कट्टी बट्टीतून हे नातं जिव्हाळ्याचं होत...
मोठा भाऊ असेल तर बाबांनंतर बाबांची जागा घेऊन प्रेम करत रहातो. हट्ट पुरवत रहातो...आणि छोटा असेल तर हट्ट करुन आपल्याला आई व्हायला लावतो. बहिणीला जगाच्या वाईट्ट नजरेपासून वाचवायला हा नेहमीच तयार असतो.. आख्या जगाबरोबर बहिणीसाठी लढायला सज्ज असतो.
आपल्या इथे भाऊबीज, रक्षाबंधन हेही सण बंधूप्रेम जागविण्यासाठी, कृतज्ञताभाव व्यक्त करण्यासाठीच असतात. देश कोणताही असो प्रेमाची व्याख्या तिच असते. काळ कोणताही असो प्रेम तसंच व्यक्त होत असते.
भाऊबहिण हे नातं माधुर्याचं, स्नेहाचं असतं, मग ते सख्खं असो वा मानलेलं.. "तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा..." हे कविवर्य भा. रा. तांबे यांचे लडीवाळ गीत मला आणि दादांना खूप आवडायचं.. धाकट्याचा पाय घरात टिकत नसे.. दादा राजकारणी असले तरी कुटूंबवत्सल होते.
बाबांची जागा कोणीच भरून काढणार नाही पण दादांचा ती उणीव मला, मुलांना भासू नये म्हणून धडपड असायची.. जगातील सर्व भाऊबहिणींना बंधू दिनानिमित्त एकमेकांचा आठव येवो.. कारण हल्ली नातीही डिजिटल झाली आहेत. असो....
माझे दोन्हीही भाऊ या जगात नाहीत. पण मला माहित आहे ते जिथे असतील तिथून माझ्यावर त्यांची माया सांडत असतील. कारण ही छोटी बहीण त्यांची खूपच लाडकी होती.
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)