अहमदनगर - नेवासा तालुक्यातील वाकडी येथे विहिरीत पडलेल्या मांजराला काढण्यासाठी गेलेल्या ५ व्यक्तींचा एका पाठोपाठ विहिरीत बुडून दुर्देवी मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. सायंकाळी उशिरापर्यंत प्रशासन मदतकार्य करत होते.
वाकडी येथील काळे कुटुंबातील ५ व्यक्तींचा मृतांमध्ये समावेश आहे. एक मांजर विहिरीत पडल्यामुळे काळे कुटुंबातील मुलगा त्याला काढण्यासाठी विहिरीत उतरला. मात्र विहिरीत गोबर गॅस असल्यामुळे तो बेशुद्ध पडला.
काही वेळाने त्याला पाहण्यासाठी त्याचे वडील गेले असता तेही तेथेच बेशुद्ध पडले. काळे कुटुंबातील एका पाठोपाठ एक सदस्य मदतीसाठी गेले असता हा दुर्दैवी प्रकार घडला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली.
सायंकाळी उशिरापर्यंत एक मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले होते. या घटनेतील एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असून त्यास उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जुनी विहीर असल्याने प्रशासनाला मदतकार्यात अडचणी येत होत्या.
बबलू अनिल काळे (वय २८), अनिल बापूराव काळे (वय ५५), माणिक गोविंद काळे (वय ६५), संदीप माणिक काळे (वय ३२), बाबासाहेब गायकवाड (वय ४०) या पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर विजय माणिक काळे (वय ३५) हे वाचले असून त्यांना उपचारासाठी नगरला रुग्णालयात दाखल केले आहे.
(या घटनेबाबत ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी हे पेज रिफ्रेश करत राहा)