विठोबा इज मिंसिंग ॲट पंढरपूर...! (लघुकथा)


'कोई हिंदु, कोई मुस्लिम, कोई ईसाई है.. सब ने इन्सान न बनने की कसम खाई है..!' विठ्ठलाच्या हाराची जबाबदारी कादरच्या तीन पिढ्यापासून त्याच्या घराण्याकडे होती. मुंडावळ्या, बाशिंग, मोती, नारळ, तयार गौरीहर आणि विठ्ठल पुजेला लागणारे विविध फुलांचे, तुळशीचे कलात्मक हार, असं सारं कादरकडे मिळायचे.

देशमुख आणि देशपांडे यांच्या वाड्यात छोटा नजीर फुलपुडा द्यायचा. देशमुख काकी नजीरसाठी चकली काढून ठेवत. तशा देशपांडेकाकू खोबऱ्याची वडी नजीरसाठी राखून ठेवत... हे सारं कादरच्या अनेक पिढ्यांपासून चालत आलेलं....!

परवा परवा विठ्ठलाच्या मूर्तीला लेपन करण्यासाठी चार दिवस मंदिर बंद झाले.. आता विठोबा दर्शन होणार नाही म्हणून कादर कसानुसा झाला होता, "क्या जी आपने खाना नै खाया परसुसे देख रही मैं आप का किधरच ध्यान नै है..!"

"अरे कुच नहीं हुआ, बचपन सें विठोबा को हार देता हूं मेरा बनाया हार पैन के विठोबा कैसे साजरा दिखता हैं, सलमा दोईच दिन देका नही उसको.. मन नै लग रहा... चलो उसकीच मर्जी..!" "वैच तो अम्मी ने मुजे बताया तो आप बचपन से विठ्ठल का पिछे पागल से हैं, अम्मी बोल रही थी एक दिन बारिश में तुलसी मिली नै तो आपने खाना नै खाया.."

"अरे मेरा वैसाच हैं... विठोबा मेरेकु दोस्त जैसा लगता है... अम्मी गई ना तो मैं विठोबाके सामने फुट फुट कर रोया.. क्या बोलू उसने संभाला मुझे और अब्बा को भी...!" सलमा कादरकडे पहात राहिली.. ज्या श्रध्देने नमाज अदा करतो, त्याच श्रध्देने विठ्ठलाच्या चरणी लीन होतो. विठ्ठलाचे नांव काढले तरी अम्मीच्या आठवणीने जसा हळवा होतो तसाच हळवा होतो..

तिकडे मात्र आख्या पंढरपुरी वेगळंच घडत होतं. देवस्थान कमेटीची निवडणूक झाली. अन् पूर्वीपासून पंचवीस, तीस वर्षे काम करणारी सारी माणसं हरली होती..! देशमुख आणि देशपांडे काकांना घरी बसावे लागले होते. दुसऱ्या दिवशी नवीन कमेटी पदग्रहण करती झाली.

कोण कोण काय सेवा पुरविते याची माहिती नव्या कमेटीने घेतली. काही कंत्राट काढून घेण्यात आली.. कादरचंही हार, फुले द्यायचे कंत्राट काढून घेण्यात आले. कादरच्या कुंटुंबावर पहाड कोसळला..

शेतात, अर्ध्या एकरात विकत घेऊन लावलेली तुळस त्याला दिसत होती. त्याने बनविलेला हार घातलेला विठोबा दिसत होता. "मैं मुसलमान हूं विठोबा ये मेरा कसूर है क्या?" कादरला दु:खावेग आवरेना. तो तुळशीला तोडत तोडत धाय मोकलून रडत होता..

शेजारीच असलेली चंद्रभागा शांतपणे वहात होती.. सलमा लहानग्या नजीबला घेऊन रात्रभर कादरला शोधत होती, देशमुख काका आणि देशपांडे काकांनी तिला बळेच घरी पाठवले अन् त्यांची मुले कादरला शोधू लागली.. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

तिकडे मंदिरात पांडुरंगाच्या चेहऱ्यावरील आवरण हलकेच निघालेले पाहून बडवे चिंताक्रांत झाले.. आणि.. दोन दिवसांनी पंढरपूर पासून सहा सात किलोमीटरवर गळ्यात तुळशीचे झुपके अडकलेला निष्प्राण कादर सापडला...!

सारं पंढरपूर हळहळत होते..
आणि विठोबा...?
विठोबा इज मिंसिंग ॲट पंढरपूर....!

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !