दि. ३ एप्रिल १६८०. ही तारीख काही इतर तारखे सारखी सामान्य नव्हे ! अगदी मोजक्या असामान्य तारखांपैकीही ती नव्हे.. ती त्याहूनही खास आहे.. ती तारीख म्हणजे, "महाराष्ट्राच्या कातळ काळजाच्या शाईने सार्वभौम काळाच्या ललाटावर कोरला गेलेला अमीट वेदनेचा शिलालेख आहे तो.
विशाल सह्याद्रीचे भाळ म्हणजे किल्ले रायगड ! त्या भाळाचे कुंकमतिलक म्हणजे स्वराज्य.! अन् लालबुंद कुंकुमभरल्या भाळाचे सौभाग्य म्हणजे 'शिवराय' !!" अवघ्या अर्धशकाच्या काळात.. बालपणातले काही वर्षे सोडली, तर स्वराज्याचा वेल लावणे, तो रूजवणे, वाढवणे श्वापदापासून संरक्षिणे, त्याची फळे मुक्तहस्ते वाटणे, हे केवढे दिव्य.
स्वराज्य मोडून पडले, राजा नसला, कितीही विपरित परिस्थिती आली, तरी स्वराज्याची उर्मी मनामनात तेवत ठेवणारं फिनिक्स पक्षाचं वेड, महाराजांनी या सह्याद्रीच्या कुशीत पेरलं.. हे महाराजांचं सर्वात अलौकीक काम आहे.
तीस पस्तीस वर्षात अवघ्या जगताच्या कॅनव्हॉन्सवर आपल्या अविश्वसनिय कर्तृत्त्वाचे चित्र रेखाटून शिवराय अजरामर ठरले. 'यावश्चंद्रदिवाकरो' किर्ती करून पुढच्या पिढ्यांसाठी अपार अभिमान, आदर्श मागे ठेवून शिवराय परलोकी गेले. स्वराज्याच्या अन् लौकिकाच्या तारूण्यातल्या दुपारी १२ वाजता सूर्य आपले तेजाळ प्रभामंडळ सह्याद्रीवर रोखून कुणाचीतरी वाट पहात होता.
मलूल झालेला रायगड उन्हाळ्याच्या वणव्यात अनामिक दिवाभिताच्या सावलीला निपचित पडला होता. अलिकडंच अस्सल नागानं कात टाकून सळसळावं तसं सळसळणारं रायगडाचं सळसळतं रुधिर 'भर' उन्हाळ्यातही थिजून गलितगात्र झालं होतं. नगारखान्याचं वाजणं चमत्कारिक वाटतं होतं.
गेले दोन पाच दिवस.. त्या टिपरातून पडणारा ठोका फक्त भैरवीचा नाद का आळवित होता.? हे रांगड्या रायगडावरच्या भाबड्या मावळ्यांना उमगत नव्हतं ! उमगलं तेव्हा उशीर झाला होता. लवकर उमगून तरी काळजीपलिकडं काय केलं असतं त्यांनी ?
एरवी निर्गुण अन् निराकार जगदिश्वराला कधी नव्हे तो उमाळा दाटून आला होता. पण प्रभू जगदीश्वराचा उमाळा मंदिराच्या चिरेबंदित विरुन गेला. स्वराज्याचं ऊर्जस्वल सत्त्व कातळ कड्यावरून आकाशी झेपावलं. काळाची टिकटिक १२ वर येताच निमिषभर स्तब्ध झाली. पण ती थांबत नसते. कशानेही, कुणासाठीही. निमिषमात्रदेखिल.!
पुढच्या ठोक्यासाठी कालपुरुषाने पाऊल उचललं.. अन् सह्याद्रीचे सौभाग्य आकाशाच्या निर्वात पोकळीत अनंताच्या प्रवासाला निघाले... महाराज निघाले.. शंभुराजे पोरके झाले, स्वराज्य ओकंबोकं दिसू लागलं ! रयतेचा वाली गेला अन् रयत हवालदिल झाली. प्रत्येक गडावर चिरान् चिरा... पायवाटेच्या धुळीतला कण अन् कण शहारला.
सजीवाचा प्राण अन् चैतन्य निर्जिव पत्थरावर उदासी पांघरुन अनंतात विलिन झालं. ३ एप्रिल १६८० शनिवार. शिवराय गेले.. विचार, आचाराची अन् सत्वशिलतेची विचारधारा मागे ठेवून गेले. त्या रूपाने ते चिरंजिव ठरले..!
आपल्या अवतीभोवती ते आजही आहेत, पण लौकिकासाठी आदरांजली अर्पण करुया. शिवरायांच्या पावन स्मृतीस शतशः शतश: प्रणाम..!
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)