झापवाडीच्या सर्वोदय पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात


अहमदनगर - साडेचार ते १० वर्षे वयोगटातील शाळकरी मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सार्वजनिक स्वच्छता अभियान, स्त्री जन्माचे व शिक्षणाचे महत्व, याविषयी जनजागृती करत उपस्थितांचे मनोरंजन केले.

निमित्त होते नेवासा तालुक्यातील झापवाडी येथील सर्वोदय पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण व वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याचे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख, भाऊसाहेब खंडागळे, शाळेचे संस्थापक एकनाथ वाघ, देवदत्त कोरडे, रामदास वाघ, राजउद्दीन सय्यद बालमभाई सय्यद, बाळासाहेब झरेकर, सीताराम भांड, पांडुरंग वाघ, रामकीसन काळे, सुनील वाघ मेजर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

शाळेचे संस्थापक एकनाथ वाघ यांनी सुरुवातीला पाहुण्याचे स्वागत करून शाळेच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. यानंतर प्रमुख पाहुणे उदयन गडाख यांनी ग्रामीण भागात असूनही प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मुलांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक केले.

या कार्यक्रमात उदयन गडाख आणि इतर पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेत यश संपादन केलेल्या सुमारे ५० विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले.

'आला होळीचा सण लय भारी, बेटी जनम ले जिस घर में, मेरे घर राम आये हैं, आई विना मला करमत नाही', या गाण्यांतून कौटुंबिक नात्यांचे महत्व विषद केले. तसेच भारुड व इतर लोककलेचे प्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले. याद्वारे सामाजिक जाणिवांबद्दल जनजागृती करण्यात आली.

या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी कोरडे, मोहिनी वाघ व पुंड मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रुपाली बनकर मॅडम तसेच इतर कर्मचारी वृंद प्रयत्नशील होते. या कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी सोबत स्नेहभोजनाचा आनंद घेतला.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !