अहमदनगर - येथील जिल्हा सत्र न्यायालयातील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी महेश एकनाथ देशपांडे याची विनयभंगाच्या गुन्हातून निर्दोष मुक्तता केली आहे.
देशपांडे याच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये सन २०२१ मध्ये विनयभंगाच्या गुन्ह्याची नोंद झाली होती. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करुन देशपांडे यांच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
पोलिसांनी अटक केल्यापासून देशपांडे हा सबजेल कारागृहात होता. त्याच्या घरची परिस्थिती ही अत्यंत हलाखीची असल्याने त्याला स्वतःची बाजू मांडण्यासाठी विधिज्ञांची नेमणूक करता आली नव्हती.
त्यामुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर यांचेतर्फे त्याला मोफत व सक्षम विधी सेवा देण्यासाठी लोकअभीरक्षक कार्यालय, अहमदनगर, येथील सहाय्यक लोक अभीरक्षक अॅड. रुपाली शिवाजीराव पठारे यांची बचाव विधीज्ञ म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
ऍड. रुपाली पठारे यांनी हे प्रकरण गुण दोषावर चालवले. अॅड. रुपाली पठारे यांचा युक्तिवाद पाहता न्यायालयाने या खटल्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता केली. यामुळे लोक अभीरक्षक कार्यालयाचे कामावर समाधान व्यक्त केले जात आहे.