'बॉडी शेंमिंग' नको, माणसांशी माणसासारखे वागा..


आपला देश सहिष्णु आहे, असं नेहमीच म्हणतो आपण. हल्ली सोशल मिडियावर ट्रोलींगची पध्दत बोकाळलीय ती खरोखरीच घातक आहे.. सोशल मिडीयाच कशाला प्रत्यक्षात जे कुजकट बोलण असतं तेही ट्रोलींगचं ना.!


बॉडी शेंमिंग म्हणजे काय ? एखाद्या व्यक्तीला त्याच्या शरीराच्या आकारमान, वस्तुमान, स्थुलता, हडकुळेपणावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अपमान करणे, चिडवणे, डिवचणे म्हणजे बॉडी शेमिंग..!

असे करुन आपल्या निकृष्ट दर्जाच्या विचारांचे आणि छोट्या कुवतीच्या मेंदूचे प्रदर्शन भरवतो. त्या एखाद्याच्या मनात त्याच्या बाह्यांगावरुन न्युनगंड निर्माण करणे, म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्त्वांचा अपमान करणे आणि प्रतिभेचा खून करण्यासारखेच आहे.

"अय्या तुला जमिनीवर मांडी बसता येत नाही.. मी बसू शकते. आम्ही बाई खरचच पुण्यवान बाई", असं बाई परवा एका समारंभात म्हणाल्या.. मी त्यांच्या बौध्दिक क्षमतेवर मनोमन हसले. मला कंबरेचे दुखणं झाल्यावर डॉक्टरांनी निक्षून सांगितले खाली वाकणं किंवा मांडी घालून बसणं टाळा.

आता जिन्याच्या ३५ पायऱ्या तुम्हांला चढता येतील का असं खवचटपणे विचारणं, खाली बसता येत नाही त्याचा हिशोब पापपुण्याशी लावणं.. हे केवळ समोरच्याचे खच्चीकरण करायचे म्हणून होत असतं.

अर्थात अशा शब्दांना महत्व देणं म्हणजे, 'भटाला दिली ओसरी...' म्हणून अशा शब्दांना आपल्या ओसरीवर सोडा, पण दारात सुध्दा उभं करुन घेऊ नका.

काल एका अभिनेत्रीने सांगितले, बाळंतपणात तिचं वजन थोडसं वाढलयं म्हणून तिला निर्मात्याने चित्रपटात घ्यायला नकार दिला. चित्रपटांत तिचा अभिनय महत्त्वाचा का दिसणं ? आता ह्या कारणांसाठी तिला नाकारणं म्हणजे तिच्या प्रतिभेला मारुन टाकणं नाही का ?

चवळीच्या शेंगेसारखं शरीर म्हणजे सुंदर.., हे मापदंड कोणी काढले.? स्त्रीच्या शरीरात तिच्या अंर्तगत घडामोडीमुळे तिचं शरीर कधी वाढत, कधी कमी होतं. मग बाईंच्या जाडीवर फालतू विनोद.. ढोली, म्हैस, जाडी बुलडोझर इ. बोलून तिला खजील करणे..

स्त्रीला कळतं बर कोण निखळ चेष्टा करतं आणि कोण कुचेष्टा करतं.. असल्या जीवघेण्या कुचेष्टेमुळे एक भयंकर न्युनगंड त्यांच्या मनात घट्ट रोवून रहातो. यामुळे समोरच्याचा आत्मविश्वास कमी होतो हे मात्र निश्चितच.

आता हा लेख तुम्हाला पाठवायचे कारण म्हणजे.. आता माझ्या जेष्ठ मैत्रीणीच्या वॉलवर वाचले, अतिश्रीमंत गुजराती कुटूंबातील महिला.. वय ४५, वजन प्रचंड वाढलेले, केस थॉयराईडमुळे अचानक पांढरे झाले. आपण सुंदर दिसत नाही या न्युनगंडापायी ती महिनोमहिने बाहेर पडत नव्हती.

परवा या मानसिक तणावाखाली तिने दहाव्या मजल्यावरून उडी मारली, चिठ्ठीत लिहिलेले होते, 'मला माझ्या पिकलेल्या केसांची आणि वाढत्या वजनाची लाज वाटत आहे'.. यावर माझं मन सुन्न झाले आहे. समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत.

स्त्रीला सौंदर्याच्या मापदंडात बसवून आपण तिचं माणूसपण हिरावून घेत आहोत का.? वाढत्या वजनाची काळजी कशासाठी, तर त्या वजनाबरोबर कुठल्याही आजाराने आपण ग्रस्त होऊ नये म्हणून आपण नियमित व्यायाम, आहार करावा. स्वत:ची काळजी घ्यावी हे तर प्रत्येक स्त्री-पुरुषाला कळतं.

पण आपलं वाढतं वय, त्याबरोबर येणाऱ्या त्या खुणा यात लाजण्यासारखे काय आहे.? उलट वाढत्या वयाबरोबर येणारी मॅच्युरिटी, वागण्यात बोलण्यात येणारे ग्रेसफुल बदल ह्याचा अभिमान हवा. बदल अपरिहार्य आहेत, ते खुल्या मनाने स्विकारणे फार महत्त्वाचे.!

हे सौंदर्याचे मापदंड लोकांच्या मनात इतके रुतले आहेत विशेषतः महिलांच्या बाबतीत. एक उदाहरण सांगते... कालच अभिनेत्री सुचित्रा सेन यांचा जन्मदिन होता. त्यांना पद्मश्री मिळाली तरी त्या घ्यायला गेल्या नव्हत्या. का तर प्रौढत्व आलेले, वृध्दत्वाकडे वाटचाल सुरू झाली होती.

मग त्यांना समाजासमोर यायची लाज वाटत होती. हा समाज व्यवस्थेचा एक बळीच आहे असं मला वाटतं. अभिनेते राजकुमार यांनी मृत्यू व्हायच्या आधी स्पष्ट लिहिले होते की ते गेल्यानंतर त्यांची डेड बॉडी किंवा चेहरा कुणालाही दाखवू नये. बेदरकार वृत्तीच्या भूमिका करणारा माणूस आतून एवढा कमकुवत असावा.?

वय आणि शरीरातील इतर बदल स्त्रीला सहज स्विकारू दिले जात नाहीत. कारण लहानपणापासून तिच्या मनावर, 'स्त्रीने सुंदर दिसले पाहिजे, ती कमनीय असली पाहिजे, गृहकृत्यदक्ष असली पाहिजे, अशा परंपरांच्या विटा तिच्या डोक्यावर सतत ठेवल्या जात असतात.

मग ती समाजपुरुषाच्या अंगणात आपोआप धसतं जाते. यावरून समाज म्हणून आपण नापास झालो आहोत हे स्पष्ट आहे. समाजात स्त्रीकडे पहायची दृष्टी निकोप नाही.तिचं कर्तृत्वाचा आलेख पहायचा नाहीच पण तिच्या रंगावर, वजनावर, उंचीवर, पाचकळ विनोद करून आपली विकृती दाखवायची.

असे विनोद करून महिलाही आनंद घेत असतात.. ही एक आपण सुपिरिअर असल्याची फोल भावना आपण जोपासत असतो. म्हणून मी माझ्या सख्यांना नेहमी सांगत असते, 'कोण तुम्हांला रंगावरुन, पिंपल्स आहेत इ. अनेक गोष्टीवरुन कुचकट टोमणे मारत असेल तर सरळ सरळ दुर्लक्ष करायलाच शिका.

तुमच्या शरीरावर, रंगावर अतोनात प्रेम करा.. आणि हे प्रेम खूप आवश्यक आहे.. ह्या प्रेमासाठी जरुर फीट रहा. त्यासाठी चवळीची शेंग असायची अजिबात जरुरत नाही. दहा-वीस किलो तुमच्या आनंदाचे अडथळे ठरुच शकत नाहीत. तुमचा वजनकाटा तथाकथित सौंदर्याच्या मापदंडात बसत नसला तर फक्त तुम्ही किती सकारात्मक आहात, हेच लक्षात ठेवा.

आपलं व्यक्तिमत्व पाण्यासारखे पारदर्शक, निखळ व्हावं, असं वाटत असेल तर दुसऱ्यांना अशा जखमा करणं थांबवा. तरच तुम्ही माणूस म्हणून घ्यायच्या लायकीचे रहाल. स्वतःच्या वयाची, वजनाची लाज कशाला वाटू द्यायची.?

आपण कुणाला फसवत नाही ना, प्रामाणिक आहोत ना.. माघारी दुसऱ्यांची टिंगलटवाळी करत नाही ना, हे प्रश्न स्वतःला विचारतं रहा... आपल्या कामाने, वागणुकीने प्रिय व्हा. बस्स.. माणसाने माणसांशी माणसापरी वागणे.. चांगलं माणूस व्हायला अजून काय हवं.!

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !