'आम्ही त्यांच्या पोटी आलो असतो तर अध्यक्ष झालो असतो..', 'सेल्फी काढून नेते होता येत नाही'.. सभेत तिच्यावर ओरडून 'तू बोलू नकोस', असे वक्तव्य करणाऱ्या नेत्याच्या भाषेची प्रत तर सर्वांनाच माहित आहे. मला त्यावर अजिबात भाष्य करायचे नाही. पण..
मुलगी आहे म्हणून एखादीला तो वारसा मिळाला, तोही तिच्या वैचारिक आणि सामाजिक बुध्दीमत्तेच्या जोरावर. या मुलीने वडिलांचे विचार, कर्तृत्व घेतले आहेत. स्वतःला सिध्द केले आहे. मूकबधीर मुले वास्तवात कर्णबधीर असतात, ही अडचण लक्षात घेऊन अमेरिकेतील स्टार्की फाऊंडेशन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मूकबधीर मुलांना, तसेच ज्येष्ठांना श्रवणयंत्रे बसवितात.
सन २०१३ पासून हे काम अव्याहतपणे चालू आहे. या कामाची "गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकने"दखल घेतली आहे. एक वर्षी झालेल्या या कार्यक्रमात केवळ आठ तासांत तब्बल ४ हजार ८४६ जणांना श्रवणयंत्रे बसविण्याचा जागतिक विक्रम करण्यात आला आहे.
आपल्या मतदारसंघात एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये.. म्हणून हजारोंच्या संख्येने सायकलींचे वाटप झाले आहे. अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी, शालेय शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांच्या या कामासाठी युनिसेफ आणि 'पार्लमेंट्रीयन ॲवॉर्ड फॉर चिल्ड्रन' हा पुरस्कार मिळालेला आहे.
पार्लमेंटमध्ये विविध समस्यावर विचार मांडण्यासाठी 'महासंसदरत्न' हा सन्मान मिळालेला आहे. हे सर्व सुप्रियाताईच्या कामामुळे मिळाले आहे. त्यांची क्षमता होती, पण त्यांनी आपल्या वडिलांकडे राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी मागणी केली नाही की कधी आपलं स्त्रीत्वाचे कार्ड वापरले नाही.
मला 'स्त्री' म्हणून नेहमीच मुलगा म्हणजे वंशाचा दिवा याविषयी प्रश्न पडतात. संविधानाने आमचे हक्क आम्हाला देऊन ७५ वर्ष झाली पण विचारसरणीत फारसा बदल झालेला आहे, असं वाटतं नाही. समाजपुरुषाची स्त्रीकडे आणि पुरुषांकडे पहायची दृष्टी समान नाही हे सतत जाणवत राहते.
पुरुष आक्रमक असतील तर वेगळी कार्यपद्धती किंवा वेगळी कार्यशैली अशी स्तुती होते. पण स्त्रीला एक चौकट असते. तसेच तिने वागले पाहिजे अशी अपेक्षा समाजपुरूषाचे असते. पार्लमेंटमध्ये, विधानभवनात तिने भारतीय पोशाख करावा हा तर अलिखित नियमच बनलेला आहे.
मागे २०२३ मध्ये 'इंडिया टुडे'च्या वतीने चार राजकारणी महिलांची प्रकट मुलाखत घेण्यात आली होती. त्यातही पंकजा म्हणाल्या होत्या, 'महिला म्हणून जरी वारसा म्हणून मी आले, तरी बाबा गेल्यावर माझ्यासमोर वेगळी आव्हाने उभी राहिली होती. मला वेळोवेळी स्वतःला सिध्द करावे लागले.'
प्रणिती म्हणाल्या, 'राजकारणी व्यक्तीचा एखाद्याला राजकीय क्षेत्रात येण्याचा गेटपास मिळाला असला तरी स्त्रीची इतरांशी उगाच तुलना होत रहाते.'
प्रियांका चर्तुवेदी म्हणाल्या, 'एखादी स्त्री आऊट ऑफ वे जाऊन काही बोलली तर स्त्री असूनही असं बोलली अशी टीका होते. तेच पुरुष बोलला तर 'स्पष्टवक्ता', 'करारी' अशा उपाध्या मिळतात.' हीना म्हणाल्या, 'मी डॉक्टर आहे, व्यवसाय ठराविक वेळेत होतो. पण राजकारणात मला चोवीस तास सर्वांसाठी उपलब्ध रहावे लागते.'
सुप्रिया, पंकजा, प्रणिती, हीना, प्रियांका ही काही प्रातिनिधिक उदाहरणे झाली.. सुषमा स्वराजना घरुन पाठींबा होताच. पण अभ्यासू नेतृत्व असल्याने त्यांनी एक वेगळा ठसा उमटवला आहे. सोनिया गांधींना संघर्ष, दु:ख, अपमान वाट्याला आले. अतिशय खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर टीकेचे शेणगोळे फेकण्यात आले.
इंदिराजी तडफदार आणि आक्रमक नसल्या तरी आपल्या सुसंस्कृत वागण्याने त्या लोकप्रिय झाल्या आहेत. मायावती, ममता, जयललिता, मनेका गांधी, यांनीही स्वतःला सिध्द केले आहे. इंदिराजींना नेहरूंनी पुढे आणले नाही. त्यांनी त्यावेळी पटेलांची कन्या मणिबेन पटेल यांच्या कन्येला उमेदवारी दिली आहे.
इंदिराजींना 'गुंगी गुडीया' म्हणणाऱ्या लोकांची तोंडं इंदिराजींनी आपल्या कार्याने बंद केली आहेत. तरीही मुलांना वडिलांचा वारसा जितका सहज मिळतो तसा मुलींना मिळत नाही. नाव वापरले तरी लोकांना प्राॅब्लेम असतो. प्रियंका गांधींनी गांधी लावलं तरी ट्रोलरधाड अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करताना दिसते.
यावरून एक आठवले रॅंगलर परांजपे यांच्या कन्या प्रसिद्ध लेखिका शकुंतला परांजपे यांनी वडिलांचे आडनाव लावले, त्यांची मुलगी सई परांजपे यांनी आपल्या आजोळचे आडनाव लावले.. पण तेव्हा एवढी चर्चा झाली नाही... असो. ज्याच्या विचारांची पातळी.!
आता मंत्रीमंडळात किती स्त्रियांना स्थान मिळाले आहे.? हे सारे पाहून मला प्रसिद्ध लेखिका 'व्हर्जिनिया वुल्फ'ची आठवण येते. लहानपणी आईवडील जातात. आईवडिलांच्या मृत्यूनंतर हालाखीची परिस्थिती सहन केलेली अतिशय संवेदनशील लेखिका...
स्त्री स्वातंत्र्याबद्दल त्या आपल्या 'थ्री गिनीज' या पुस्तकात म्हणतात, 'मी स्त्री आहे म्हणून माझा असा कोणतंही गावं देश नाही..'. खरं आहे ना..? लग्नाआधी वडिलांचे, नंतर नवऱ्याचे नाव... यात ती कुठे आहे.? ती कोण आहे.?
व्हर्जिनिया म्हणते, 'विविध क्षेत्रांतून स्त्रियांना वगळण्याचा पुरुषी कावा असला, तरी त्यांच्यावरील बंधने दूर होताच, त्याही सर्जनशीलतेची अत्युच्च शिखरे गाठू शकतील. त्यामुळे आपली स्वतंत्र राजकीय-सांस्कृतिक अस्मिता सिध्द करण्याची संधी स्त्रियांना प्राप्त होईल.'
म्हणजे बाईला सिध्द केले तरच वारसा मिळणार, त्यांच्या पोटी जन्म घेतला म्हणून नाही. लेकी देशातील असोत परदेशातील घराण्याचा वारसा नांवाने नाही तर कर्तृत्वाने मिळतो, हे आमच्या लक्षात आले आहे. आत्मसन्मान आणि आत्मस्वाभिमानी असणाऱ्या सीतेचा वारसा आम्ही चालवत आहोत आणि चालवणार आहोत.. हे मात्र नक्की..! आम्ही रबर स्टॅम्प होणार नाही आमच्या कामातून आम्ही बोलत राहू..
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)