आज सावित्रीआईंचा स्मृतीदिन. त्यांना विनम्र अभिवादन. भारतातील समस्त स्त्री जातीला अक्षरओळख देणाऱ्या युगधंरा म्हणजेच सावित्रीआई..!
भारतात स्वातंत्र्य संग्रामाबरोबर समाजसुधारणेची चळवळ मोठ्या जोमाने उभी राहत होती. विविध धर्मात जाती, चालीरीती, रुढी, परंपरा, अंधश्रध्दा होत्या. त्या नष्ट करण्यासाठी जोतिराव आणि सावित्रीआईंचे योगदान मोलाचे आहे.
त्याकाळी महिलांना शिक्षण, सत्तासंपत्ती, यांत कसलेही आधिकार नसायचे.. हुंडाबळी, बालविवाह, सती गेल्या नाहीत तर बालविधवा, मग तिला अनेक क्रुर अटींचा सामना करावा लागे. केशवपन करुन तिला जाणिवपूर्वक कुरुपकेले जाई. मग घरी किंवा बाहेरचे लोक त्यांच्यावर अत्याचार करत. त्यातून दिवस राहिले तर तिला भयंकर छळाला तोंड द्यावं लागे.
अशा या अंधाराला प्रकाश देण्यासाठीच जणू या उभयतांचा जन्म झाला होता. सावित्रीबाईंचा जन्म ३ जानेवारी १८३१ ला झाला. जोतिरावांशी १८४० ला विवाह झाला. त्यावेळी सावित्रीबाई ९ आणि ज्योतिराव १३ वर्षाचे होते. सावित्रीबाईंचा जिज्ञासू स्वभाव लक्षात आल्यावर त्यांना व आपल्या मावसबहिण सगुणा यांना त्यांनी शिकवले.
मिचेलबाईंना त्यांची परीक्षा घ्यायला लावली.१८४५-४६ ला अध्ययन व अध्यापन असलेल्या शाळेत दोन वर्षासाठी कोर्स करायला लावला. सावित्रीआईं आता प्रशिक्षित शिक्षिका झाल्या होत्या. पुण्यातील तात्यासाहेब भिडेवाड्यात दरमहा दोन रुपये भाडं ठरलं आणि मुलींची शाळा सुरु झाली.
सावित्रीआई रस्त्यावरून जाताना उच्चवर्णिय त्यांच्यावर अश्लिल शेरे, खडे, शेणगोळे टाकत, पण निष्ठेने सावित्रीआईं आपलं काम करत. एकदा मात्र एकाने त्यांच्या शरीराशी लगट करण्याचा प्रयत्न केला. सावित्रीआईंनी त्या व्यक्तीच्या खाडकन मुस्काडात लगावली..मग मात्र ती व्यक्ती त्यांच्या वाटेला गेली नाही.
सुरवातीला पाच सहा मुली असलेली ही शाळा वर्षाअखेरीस ४०-४५ मुली शिकायला येऊ लागल्या. सन १८४६-१८५२ या चार वर्षात पुणे व ग्रामीण परिसरात १८ यशस्वी शाळा चालू झाल्या. यात सगुणाबाई, फातिमा शेख, यांचेही योगदान आहेच. शाळेतील अभ्यासक्रमात गृहव्यवस्थापन, मुलांचे पोषण, आहार, विहार हे विषय सावित्रीबाईंनी आवर्जून घातले होते.
विधवा महिलांना बलात्कारातून, गैरफायदा घेऊन झालेल्या गर्भारपणात आधार मिळावा, म्हणून ज्योतिरावांनी आणि सावित्रीआईंनी 'बालहत्या प्रतिबंधक गृह' असा महिलाश्रम, अनाथ बालकाश्रम सुरु केला आणि तो समर्थपणे चालवला.
उच्चवर्णिय काशीबाईना आश्रय देऊन तिच्या यशवंत नावाच्या मुलाला या उभयतांनी दत्तक घेतला होता. फसवलेल्या महिलांना तिथे प्रवेश मिळे. तिचं नाव कुणालाही कळू न देता तिचे बाळंतपण सावित्रीआई करत.
सावित्रीआईंनी शिक्षणाबरोबर साहित्यही लिहिले आहे. ज्योतिरावांच्या वर 'सुबोध रत्नाकर' नावाचा ग्रंथ लिहिला आहे. 'काव्याफुले' या काव्यसंग्रहात त्या लिहितात..
निराधार दुःखी स्त्रीयांचा पुढारी
दुबळ्या अडाणी जनांचा मदारी
कृती तैसा खरा ज्ञानयोगी
स्त्री, शुद्राकरिता दुःख भोगी..!
हे त्यांनी ज्योतिरावांसाठी लिहिले आहे. आपल्या पतीचं मोठेपण त्यांनी विनम्रतेने स्विकारलं होतं. कोल्हापूरच्या ताराराणींना त्या अतिशय मानत. 'कोल्हापूरची महान राणी छत्रपती ताराराणीं, शोभते भूषणी शुभहस्ते तलवार, भवानी ताराबाई असूरमर्दिनी ताराराणीं, रणदेवी ती श्रध्दास्थानी नमन तिचे चरणी..!'
पराक्रमाला कृतीला देव मानणाऱ्या सावित्रीआईं नक्कीच देवभोळ्या नव्हत्या. त्यांनी आपले पूर्ण आयुष्य ज्योतिरावांनी आखलेल्या आदर्श मार्गानी घालवले. ज्योतिरावांच्या निधनानंतरही त्या निरंतर काम करत राहिल्या.
१८९६-९७ ला पुणे आणि परिसरात प्लेग महामारीने धुमाकूळ घातला होता. सावित्रीआईंनी पुणे जवळील ससाणे यांच्या माळावर दवाखना सुरु केला. रोग्यांना आणि त्यांच्या कुंटूबियांना इथे त्या आश्रय देत. त्यांची सेवाशुश्रुषा करत यातच त्यांचे १० मार्च १८९७ ला निधन झाले आणि एका युगधंरेचा अंत झाला.
सावित्रीआईं लिहितात, आपण सारे जर एकाच ईश्वराची लेकर आहोत. उच्च-नीच, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष सर्व सारखेच, हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत खरा ईश्वर कळलाच नाही. सावित्रीआईंचे विचार आपण आचरणात आणणं हेच त्यांना विनम्र वंदन असेल.
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)