राम हा मर्यादेत राहणारा आहे आणि कृष्ण मर्यादा केव्हा ओलांडायची हे सांगणारा आहे. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये श्रीरामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. जोपर्यंत सामान्य परिस्थिती असते तोपर्यंत धर्म, तोपर्यंत राम.
पण एखाद्या गोष्टीतील राम आणि मर्यादा समोरच्याने ओलांडली, परिस्थिती हाताबाहेर चालली, तर कृष्ण व्हावं लागतं.. जेव्हा, जेव्हा समाजात अराजकता माजेल तेव्हा तेव्हा समाजसाठीच हाती सत्याचे चक्र काढायला हवे...!
स्थिती पूर्ववत झाली की पुन्हा तुम्ही तुमच्या मर्यादेकडे वळा. जगाच्या पाठीवरती अनेक ठिकाणी अनेकांची आक्रमणं झाली. त्या आक्रमणांमध्ये तिथे समाज, त्या त्या संस्कृती खलास झाल्या. ही भारतातली का म्हणून टिकली ?
तिथे हे दोघंजण आहेत. राम आहे आणि कृष्ण आहे. एक मयदित कसं वागायचं हे सांगणारा आहे, आणि एक मर्यादा कुठे आणि कशी ओलांडायची. मग ती ओलांडली आणि परिस्थिती पूर्ववत झाली ना की मग तो पुन्हा म्हणेल, आता मर्यादा, आता राम.
हे ओळखणारा म्हणजे बहुजनांचा वारकरी संप्रदाय आहे. म्हणून 'कृष्ण'ही त्यांच्याकडे आहे आणि 'राम'ही त्यांच्याकडे आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायाने आपल्या मुखात आणि अखंड नामस्मरणात रामकृष्ण दोघेही जपले आहेत. अगदी निरागसतेने..!
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)