महापालिकेत लोकनियुक्त मंडळ नसताना 'अहमदनगर' शहराच्या नामांतरासारख्या विषयाचा ठराव चर्चेविना मंजूर करून घेणे हे एकतर्फी वाटते. चर्चेतून जो काही निर्णय होईल, तो सर्वांना मान्यच करावा लागतो. मात्र, चर्चाच न करता थेट निर्णय घेण्याची अलीकडच्या काळातील पद्धत सर्वदूर राबविली जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांचे अस्तित्वच मोडीत निघाले की काय, अशी सध्या अवस्था आहे. दुसरीकडे प्रशासक असल्याचा (गैर) फायदा उठवत वरच्या पातळीवर निर्णय घेऊन खालून केवळ औपचारिकता पूर्ण करून घेण्याचे प्रकार सुरू आहेत.
'अहमदनगर'च्या नामांतराच्या बाबतीच असाच डाव साधून घेतल्याचे दिसून येते. नामांतराची घोषणा खुद्द मुख्यमंत्र्यांनी करूनही लोकनियुक्त मंडळ असताना यासंबंधीचा ठराव येऊ शकला नव्हता. आता मुदत संपल्याने पदाधिकारी व नगरसेवक नसल्याच्या आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या बदलत्या राजकीय भूमिकेचा जणू गैरफायदा घेतला गेला.
चर्चेविना, लोकांच्या खऱ्या अर्थाने संमतीविना नामांतराचा ठराव मंजूर झाला, असेच म्हणावे लागेल. महनीय व्यक्तींची नावे देताना ती लादण्यापेक्षा आदरपूर्वक, सन्मानपूर्वक, लोकांची समती घेऊन दिली तर त्यांचा सन्मान वाढतो. खरे तर 'अहमदनगर'च्या नामांतराची मागणी खूप जुनी आहे. मात्र, नवे नाव काय असावे, यावर एकमत होत नव्हते.
लोकांच्या दृष्टीने अद्यापही ते झालेले नाही. विविध समाज, संघटना, संस्था, पक्ष यांच्याकडून वेगवेळी नावे पुढे आलेली आहेत. तर दुसरीकडे 'अहमदनगर' हेच नाव कायम ठेवावे, अशी मागणी लावून धरणारा वर्गही मोठा आहे.
कारण इतर शहरांची अशा प्रकारची नावे आणि 'अहमदनगर', यामध्ये मोठा फरक आहे. त्यामुळे 'अहमदनगर' हे शहराचे मूळ नाव आहे, तो काही कलंक, अन्याय किंवा जबदस्तीने लादलेला निर्णय नाही, असे इतिहासातून दिसून येते.
त्यामुळे केंद्र सरकारच्या नाव बदलण्याच्या निकषात हे कितपत बसते, कसे बसविले जाणार? याबद्दल शंकाच आहे. शिवाय नाव बदलायचेच असेल, तर नागरिकांना विश्वासात घ्यायला हवे, तसेच नवे नाव काय असावे, यावर एकमत व्हायला हवे.
ज्यांनी कोणी इतर पर्याय सुचविले, त्यांच्याशी चर्चा व्हायला हवी होती. त्यातून गुणवत्तेवर निर्णय घेता आला असता. मुख्य म्हणजे जुने नाव का बदलायचे, याचीही योग्य कारणमिमांसा झाली पाहिजे. नवे नाव आदरणीय व्यक्तीमत्वाचे असले तरी ते तेवढेच आदराने स्वीकारले गेले पाहिजे, एकतर्फी लादून नव्हे.
केवळ निवडणुकीचा स्टंट म्हणून शहरांची नावे बदलून काय साधणार.? हा निवडणूक स्टंट आहे, एवढे न कळण्याइतपत नागरिक आता मागे राहिले नाहीत. 'अहमदनगर'चे तर मुळीच नाहीत. त्यामुळे याचा राजकीय फायदा-तोटा किती होणार..? हेही निवडणुकीतून लक्षात येईल.
- विजयसिंह होलम (अहमदनगर)
(यांच्या फेसबुक वॉलवरून साभार)
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)