छत्रपती शिवरायांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० ला शिवनेरी किल्ल्यावर झाला. महाराज बारा वर्षाचे असताना जिजाऊं त्यांना पुण्याला घेऊन आल्या. जिजाऊंनी बारा मावळ एकत्र करुन न्यायनिवाडा, रयतेचे प्रश्न सोडवत..
शिवराय त्यावेळी सतत आऊसाहेबांना रयतेवर प्रेम करताना त्यांचे प्रश्न जिव्हाळ्याने सोडवताना पहात होते. आऊसाहेब म्हणजेच शिवरायांचे विद्यापीठ होते. शिवरायांना जिजाऊंनी नीरक्षीरविवेक दाखवला. शहाजी राजांनी महाराजांना तलवारबाजी शिकवली होती.
जिजाऊं महाराजांकडून नियमित सराव करुन घेत.कारण १६६० ला सिध्दी जोहरच्या पन्हाळा वेढ्यात महाराज अडकले असताना त्या स्वतः युध्दावर जायला निघाल्या होत्या.. महाराजांची युध्दनिती ह्याबद्दल लिहावं तेवढ थोडच आहे. अवघ्या जगाला छत्रपतींचा पराक्रम माहित आहे.
छत्रपतींना जेवढे उघड शत्रू होते त्यापेक्षा जास्त गुप्त शत्रू होते. या गुप्त शत्रूंमुळे मराठा साम्राज्याचे अपरिमित नुकसान झाले आहे. राजांचे पहिले चित्र रेखाटले ते मीर महमंदने. त्यावेळी तो महाराजांच्या दर्शनाने भारुन गेला होता. महाराजांच्या सैन्यात ३५% मुसलमान होते. त्यांना नमाज पढण्यासाठी रायगडावर मशीद बांधण्यात आली होती.
दुसऱ्या धर्माचे आदर करणारे छत्रपतीं होती. परधर्मसहिष्णु, रयतेचा कैवारी, स्त्रीदाक्षिण्य, न्यायप्रियता, अखंड प्रसंगावधानता, प्रशासनातील अष्टपैलु दृष्टी हे गुण जिजाऊं आणि शहाजीराजांच्या कडून शिवरायांमध्ये परावर्तित झालेले दिसतात.
शहाजीराजांनी पुण्याला कान्होजी जेधे, दादोजी लोहोकरे या मावळातील वजनदार असामी शिवाजी राजांच्या मदतीसाठी पाठवले होते. एक स्वतंत्र सत्ताधीश होण्याचे बीज शहाजीराजांनी जिजाऊंच्या हृदयात रोवले. जिजाऊंनी स्वराज्याचे रोप शिवरायांच्या रुपाने ते जोपासले अन गगनास भिडवले.
पुढे शहाजीराजांनी शिवरायांना एक देवनागरीतील राजमुद्रा करुन दिली होती.प्रतिच्चंद्रलेखे वर्धिष्णुर्विश्ववंदिता ! शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते!अर्थात- प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी, विश्वाला वंदनीय असलेली शिवाची ही मुद्रा (लोक) कल्याणासाठी विराजते.
दुर्दैवाने पेशव्यांनी हे शिवशक बंद करुन बादशहाचा फसलीशक चालू केला. १७१३ पासून इंग्रजी ग्रिगेरियन कँलेंडर येईपर्यंत फसलीशक चालू होता. त्याकाळी रग्गड वतनदार महाराष्ट्रभर होते. महसूल वसूल करायचा अन गप्प आदिलशाह, मोगलांची चाकरी करत त्यांच्या अत्याचाराकडे दुर्लक्ष करायचं.
पण त्याकाळात स्वातंत्र्याचा आणि स्वराज्याचा एल्गार शहाजीराजे आणि जिजाऊंनी केला आणि अनंत अडचणी सोसून शिवरायांनी स्वराज्य उभे केले. शिवरायांच्या शंभूराजेंच्या चारित्र्याचा अभ्यास करताना मनगंढत कहाण्याचा बुजबुजाट झालेला दिसतो.
शिवरायांना मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड, संस्कृत, तेलगू अशा भाषा अस्सलिखित लिहितावाचता येत होत्या. जिजाऊंनाही या भाषा येत. त्यांनी राजांना याचे धडे दिले होते. इंग्रजांबरोबर संभाषणासाठी नारायण शेणवी हा दुभाषक होता. राजांचे गुरु फक्त आणि फक्त जिजाऊंमांसाहेबच होत्या.
अर्धवट अभ्यासाच्या आधारे लोकांनी त्यांचे गुरु म्हणून अनेक लोकांना उभे केले. राजांनी त्यांची अतिशय आवडती पोर्तुगीज बनावटीची तलवार गोवलेकर सावंत यांचे कडून ३०० होन देऊन विकत घेतली होती. तिला इतिहासकारांनी भवानीने राजांना तलवार दिली अशी आवई का बरे उठवली असेल...
तलवार ही साधन आहे स्वराज्याचे साध्य नव्हे. इथे महत्व राजांच्या पराक्रमाला, निर्भिड वृत्तीला, चातुर्याला आहे. तलवारीला नाही. मग त्याकाळी अनेक तलवारधारी होते म्हणून सर्वांनाच स्वराज्य निर्माण करता आले का.? तर नाही.
आणखीन एक.. सुभेदाराची सून चित्रपटांत अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या नांवाखाली 'अशीच अमुची आई असती सुंदर रुपवती... आम्हीही झालो असतो सुंदर वदले छत्रपतीं'. सर्वात महत्त्वाचे जगातील कोणताच पुत्र स्वतःच्या आईच्या रुपाची तुलना इतर स्त्रियांशी करणारच नाही.
कारण प्रत्येकाला आपल्या आईबद्दल नितांत आदर असतो. आऊसाहेब सुंदरच होत्या.ही वस्तुस्थिती आहे. तत्कालीन कवी जयराम पिडे त्याच्या 'राधामाधवविलासचंपू' या ग्रंथात आऊसाहेबांचे वर्णन करताना लिहतो,
जशी चंपकेशी खुले फुलजाई
भली शोभली राजास जिजाई
जिचे किर्तीचा चंबू जंबूद्विपाला
करी साऊली माऊलीसी मुलाला...!
शिवभारतकार परमानंदजी या मायलेकराच्या सौंदर्याचे वर्णन करताना म्हणतो, आऊसाहेब लावण्यवती असून भुवया धनुष्याप्रमाणे, डोळे पाणीदार, कान सोन शिंपल्यासारखे, नाक सरळ, मुखकमल प्रफुल्लित हसतमुख.!
तर राजांविषयी लिहतात, राजांचे लावण्य अपार, वर्ण सुवर्णासारखा, शरीर निरोगी, मान सुंदर, नेत्र कमळासारखे, नाक पळसाच्या पुष्पासारखे, मुख स्वभावातच मंदस्मित, छाती विशाल, बाहू मोठे, मोहक शरीरयष्टी..!
आपण म्हणाल स्वप्नजाजिजी एवढं विस्ताराने का लिहतेय तर इतिहास कपोलकल्पित नसावा हीच तळमळ आहे.
सेतुमाधव पगडी लिहतात, ४ सप्टेंबर १६५७ ला राजांनी कल्याण भिवंडी घेतलेली आहे. या सूनप्रकरणाला इतिहासात कसलाही पुरावा नाही.. आणि ज्या कल्याणच्या सुभेदाराचा उल्लेख या कपोलकल्पित कथेत आहे तो सुभेदार मुल्ला अहमद १६४६ पासून १६५७ पर्यंत विजापूरमध्येच बायकापोरांसह आहे..मग हे प्रकरण घडलेच कसे..?
माझं तरुण मित्रांना एक सांगणे आहे, अशा खोट्या गोष्टींचा विरोध झालाच पाहिजे. ऐतिहासिक आधाराशिवाय अशा गोष्टी पसरवू नयेत. अतिशय पराक्रमी आणि चारित्र्यंसपन्न अशा राजांचे चरित्राचे रोज घराघरात वाचन झाले पाहिजे.
माझ्या पाच वर्षाच्या बाळालाही महाराजांचे चरित्र माहिती असायला हवं. त्यादृष्टीने तरुणपिढीने काम करत रहायला हवं, तरच आपल्या या अभिमानाच्या आदरस्थानाचा आदर राखला जाईल. आपण राजांना देव करून ठेवणं, त्यांची आरती करणे, या गोष्टी टाळायला हव्यात. साक्षात महाराजांनाही ते आवडणार नाही...!
राजे आपले छत्रपतीं बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण रयतेचे राजे आहेत. अशा आपल्या राजांची जयंती १९ फेब्रुवारीला होतेय जयंती घराघरात करा पण..
शिवचरित्र वाचू घराघरात
शिवतत्वे आणू आचरणात
पणाला ठेवू प्राण देशासाठी
जिजाऊं, छत्रपती, शंभूराजे
यांचे स्मरण ठेवू नित्य हृदयात
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)