मनामनात विसंवादाचे उंबरठे उभे नसावेत. सुसंवादाचे राजमार्ग व्हावेत..


उंबराचे लाकूड पवित्र मानतात. पण उंबर हे औषधी आहे. म्हणून प्रवेशद्वारा उंबरठा लावत. 'उंबर + ठा' म्हणजे उंबराचे लाकूड ठेवण्याची किंवा लावण्याची जागा. ठा म्हणजे ठाण, स्थान, जागा.

पूर्वी घरं जंगलात शेतात असतं. सरपटणारे प्राणी, कीटक घरात येऊ नये म्हणून ही योजना केली असावी. पूर्वीचे उंबरे बऱ्यापैकी उंच आणि रुंद असत. स्त्रीवर अनादी काळापासून बंधने होती. त्या उंबरठ्याबाहेर कधीतरीच पडत. म्हणजे उंबरठा ही तिच्यासाठी एक प्रकारची लक्ष्मणरेषाच होती.

उंबरठा हा शब्द खरं तर अजुनही प्रचलित आहे. पण त्याचे अस्तित्व, त्याचं रुप कुठेतरी लोप पावत चालले आहे. उंबरठ्याच्या आत घर आणि बाहेर अनोळखी विश्व असतं. लौकिक अर्थाने उंबरठा बाहेरच्या जगापासुन घराला वेगळं करतो.

त्याच्याकडे पाहिलं की, घराची चौकट उंबरठ्या मुळे पूर्ण होते हे जाणवतं.. आणि उंबऱ्यामुळे चौकट जुळली गेलेली आहे असं वाटतं..

मोठी माणसं सांगायची की उंबरठ्याला कधी पाय लागु द्यायचा नाही. त्याचे पावित्र जपायला हवं. खरं तर असं वाटतं उंबरठा हा घरातुन बाहेर जाण्यापूर्वी व घरात प्रवेश करण्या पूर्वीचा स्पिड ब्रेकरच आहे. कारण तिथे क्षणभर थांबुनच प्रवेश करायचा.

अनेक विविध प्रसंगात उंबरठ्याचा उल्लेख व्हायचा.

उंबरठ्यात उभे करणार नाही ....
उंबरठ्याबाहेर हाकलुन देईन ....
उंबरठा ओलांडु देणार नाही ....

यावरुन हा फक्त एक शब्द नसुन त्या जागेचं किती महत्त्व होतं हेच दिसुन येतं. कोणी अनोळखी व्यक्ती उंबरठा ओलांडुन एकदम आत प्रवेश करीत नसतं. उंबरठ्याच्या रुपाने एक अदृश्य भिंतच उभी असायची असं वाटतं.

भगवंताच्या दर्शनाला जातानाही आधी उंब-याला नमस्कार करुन आपण प्रवेश करतो. त्या वास्तुतील परमेश्वराचे वास्तव्य तेथुनच आहे ह्याचेच तो उंबरठा प्रतिक आहे.

घरातील एखादी व्यक्ति प्रगती करण्यासाठी बाहेर पडली तर उंबरठा ओलांडला, असा शब्दप्रयोग केला जात असे. पण या प्रगतीकरीता जात असतांना या घरातील संस्कार, घराचे अस्तित्व, नाती संबंध प्रेम सोबत नेतांना दोन मिनीटे त्या उंबऱ्यावर थांबुन मगच पुढे जायला हवे. म्हणुनच मग शब्दबध्द केले जाते..

'थबकले उंबऱ्यात मी पाहुनी नवी पहाट', असं मनोमन म्हणत नववधू नव्या घरात, नवीन विश्वात पाऊल टाकत असते. या घराच्या उंबरठ्याचे कायम स्मरण हवे. आठवण हवी. जसे बाहेर जातांना तसेच बाहेरुन येतांनाही येथे थांबुनच प्रवेश केला जातो.

घरात येणारी नववधू, खूप दिवसांनी यश घेवुन परतलेला लेक, माहेरवाशीण या सर्वांना इथे उंबरठ्यातच औक्षण केले जाते, दृष्टीचा तुकडा ओवाळुन त्यांना आत घेतले जाते. बाहेरुन सोबत आलेल्या काही प्रवृत्ती तिथेच सोडुन निखळ मनाने घरात प्रवेश करावा हीच यामागील भावना असणार.

पूर्वी प्रत्येक खोलीच्या दारात सुध्दा उंबरठा असायचा. कुठल्याही खोलीत प्रवेश करण्यापूर्वी त्या खोलीशी निगडीत भावभावना देखील हा उंबरठा ओलांडताना जपायच्या असाच त्या मागील उद्देश्य असावा. आता मात्र घरात कुठेही अशा सीमा नाहीत. घराच्या आतमधील उंबरठ्यांचे अस्तित्व मात्र आता नाहीसे झालेले आहे.

घराची मुख्य प्रवेश दाराची चौकटच नाही तर घराला पूर्णत्व देणारा असा हा उंबरठा  खूप महत्त्वाचा आहे. आपण जगाची सैर करतो.. पण आपल्या उंब-याच्या आत येतो तो क्षण खरोखरीच विसाव्याचा असतो. आपण आणि बाहेरचं जग यामध्ये आपल्या घराचा उंबरठा असतो. फक्त मनामनात विसंवादाचे उंबरठे उभे होऊ नयेत. सुसंवादाचा राजमार्ग तयार होऊन जगणं राजसं होऊन जावं.

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !