'प्रतिबिंब महोत्सवात' यंदा प्रवासाशी नाते सांगणाऱ्या चित्रपटांचे ‘प्रतिबिंब’


गौरव पठाडे (अहमदनगर) - शहरातील न्यू आर्ट्स, कॉमर्स, अँड सायन्स कॉलेजच्या संज्ञापन अभ्यास विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे प्रतिबिंब चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयातील छत्रपती शाहू महाराज सभागृहात उद्या दि. १५ पासून १८ फेब्रुवारीपर्यंत सलग चार दिवस चित्रपट महोत्सव होणार आहे. 

यादरम्यान लघुपट व माहितीपट स्पर्धा तसेच फोटोग्राफी स्पर्धा व प्रदर्शन देखील आयोजित केल्याची माहिती प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे यांनी दिली. प्रतिबिंब चित्रपट महोत्सव २००८ पासून दरवर्षी आयोजित केला जातो. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात महोत्सवाचे आयोजन संज्ञापन अभ्यास विभागातर्फे केले जाते.

देशविदेशांतील दर्जेदार पुरस्कार प्राप्त चित्रपट पाहण्याची तसेच त्यावर चर्चा करण्याची संधी देणारा महोत्सव म्हणून ‘प्रतिबिंब’ ची वेगळी ओळख आहे. नगर शहर व परिसरात सर्वप्रथम असा चित्रपट महोत्सव सुरू करण्याचे श्रेय न्यू आर्ट्स महाविद्यालयाला जाते. आतापर्यंत १६ वर्षांत विविध विषयांवर आधारित जगभरातील उत्कृष्ट चित्रपट ‘प्रतिबिंब’ मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाले.

यावर्षी ‘प्रवास’ या संकल्पनेवर आधारित मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तिन्ही भाषेतील निवडक चित्रपट दाखवले जाणार आहेत. महोत्सवाची सुरुवात गुरुवारी (ता. १५) सकाळी १० वाजता ’७२ मैल- एक प्रवास’ या चित्रपटाने होईल. दुपारी एक वाजता ‘सेव्हन इयर्स इन तिबेट’ व त्यानंतर पाच वाजता ‘द दार्जिलिंग लिमिटेड’ हे चित्रपट दाखवले जाणार आहेत.

शुक्रवारी (ता. १६) सकाळी १० वाजता ‘द सीक्रेट लाइफ ऑफ वॉल्टर मिटी’, दुपारी १ च्या दरम्यान ‘हायवे’ हे चित्रपट दाखवण्यात येतील. सायंकाळी पाच वाजेपासून प्रेक्षकांना वेगवेगळ्या विषयांवरील माहितीपट पाहायला मिळणार आहेत. शनिवारी (ता. १७) सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत लघुपट स्पर्धा होईल.

शैक्षणिक अभ्यासक्रमांबरोबर विविध उपक्रम राबवण्यास महाविद्यालय व संस्थेचे नेहमीच प्रोत्साहन मिळते. त्यामुळे मागील वर्षीपासून फोटोग्राफी स्पर्धा व प्रदर्शन देखील सुरू करण्यात आले आहे. यंदा त्याकरिता देखील ‘प्रवास’ याच संकल्पनेवर आधारित स्पर्धा व प्रदर्शन होणार आहे.

देशभरातून सहभागी झालेल्या स्पर्धकांनी सुमारे पाचशे फोटो स्पर्धा व प्रदर्शनासाठी पाठवले आहेत. शैक्षणिक संस्थेने फोटोग्राफी स्पर्धा व प्रदर्शन आयोजित करण्याची सुरुवात देखील न्यू आर्ट्स कॉलेजने केली. त्यास वाढत प्रतिसाद मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे सर्व चारही दिवस ‘प्रतिबिंब चित्रपट महोत्सव’ सर्वांसाठी खुला आहे.

कोणतेही प्रवेश शुल्क न आकारता या चित्रपटांचे महत्त्व देखील समजावून घेत येईल. चित्रपटासंबंधी प्रश्नांवर मनमोकळी चर्चा देखील करता येईल. त्यामुळे नगरकर रसिक प्रेक्षकांनी प्रतिबिंब चित्रपट महोत्सवात सहभागी व्हावे. चित्रपट तसेच लघुपट, माहितीपट व छायाचित्रे अशा बहुविध चित्र माध्यमांचा आविष्कार अनुभवावा, असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.

'प्रतिबिंब चित्रपट महोत्सव’ आयोजित करताना नवनवीन प्रयोग करण्यावर संज्ञापन अभ्यास विभागाचा भर असतो. त्यानुसार यावर्षी ‘प्रतिबिंब चित्रपट महोत्सव’ अंतर्गत दि. १७ रोजी सायंकाळी ६ ते ८ यावेळेत लघुपट व माहितीपट स्पर्धेच्या परीक्षकांशी चर्चा आयोजित केली आहे.

दि. १८ रोजी दुपारी ३ वाजता नामवंत मराठी चित्रपट दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. दोन्ही कार्यक्रमांसाठी प्रवेश विनामूल्य असून चित्रपट क्षेत्रात रस असणाऱ्या प्रत्येकाला त्यामध्ये सहभागी होता येईल.

(टीप : या महोत्सवात दाखवल्या जाणाऱ्या सिनेमावरील चर्चेचे Live प्रक्षेपण आमच्या फेसबुक पेज व यु ट्युब चॅनलवर लाईव्ह केले जाईल. त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करुन आमचे फेसबुक पेज फॉलो करा.)

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !