वितरण व्यवस्था हा वृत्तपत्रांचा आधारस्तंभ, त्यांचे प्रश्न सोडवण्याची गरज - विजयसिंह होलम


गौरव पठाडे (अहमदनगर) - मराठी पत्रकार परिषद, अहमदनगर मीडिया सर्क्युलेशन असोसिएशनच्या वतीने शहरात वर्तमानपत्र वितरण अधिकारी यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात वृत्तपत्रातील वितरण अधिकाऱ्यांचे विविध प्रश्‍नांवर चर्चा करण्यात आली. 

वितरण अधिकारी यांना वृत्तपत्र कंपनी ते एजंटाशी दुवा म्हणून ग्रामीण भागात काम करताना येणाऱ्या अडी-अडचणीवर विचारमंथन करून संघटनेच्या माध्यमातून विविध प्रश्‍न सोडविण्यास एकत्र येत दिशादर्शक भूमिका घेण्याचा संकल्प करण्यात आला. मेळाव्याचे उद्घाटन पत्रकारांच्या नाशिक विभागीय अधिस्विकृती समितीचे सदस्य विजयसिंह होलम यांच्या हस्ते झाले.

प्रमुख पाहुणे म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस मन्सूर शेख, जिल्हाध्यक्ष सुर्यकांत नेटके, अहमदनगर मीडिया सर्क्युलेशन असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश रासकर, उपाध्यक्ष श्रीकांत नवले, संतोष बडवे, सल्लागार देविदास वैद्य आदींसह विविध वृत्तपत्रातील वितरण अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात सूर्यकांत नेटके यांनी वर्तमानपत्र वितरण अधिकारी यांची ही राज्यातील पहिली संघटना स्थापन झाली असून, ती मराठी पत्रकार परिषदेला जोडली गेली आहे. गावोगावी वृत्तपत्र पोहचवण्याचे महत्त्वाचे काम वितरण अधिकारी करत असतात, असे सांगितले.

विजयसिंह होलम म्हणाले की, वितरण व्यवस्था हा वृत्तपत्रांचा आधारस्तंभ आहे. ज्या क्षेत्रात काम करतात त्या क्षेत्राचा विकास व प्रश्‍न सोडविण्यासाठी ही संघटना उभी राहिली आहे. वृत्तपत्राचे कान, नाक, डोळे म्हणून वितरण अधिकारी काम पाहतात.

वृत्तपत्राला बसणारा पहिला धक्का वितरण अधिकारीला सहन करावा लागतो. सतत प्रवासात असलेले वितरण अधिकारी जोखीम पत्कारुन काम करत असतात. वृत्तपत्रांचे धोरण मोठ्या शहरातील कार्यालयात ठरत असतात, मात्र वाडी-वस्तीवर जाऊन काम करणारा हा वितरण अधिकारी विक्रेते एजंट यांच्यातील दुवा म्हणून काम करत असतो.

नगर हा चळवळीचा जिल्हा असून, अनेक नवनवीन संकल्पनांना येथे उदय झाला असून, ते राज्याला दिशादर्शक ठरली आहे. वितरण अधिकाऱ्यांच्या या चळवळीतून निर्माण झालेली संकल्पना राज्याच्या वृत्तपत्र सृष्टीला दिशा देणारी ठरणार असल्याची त्यांनी भावना व्यक्त केली.

देविदास वैद्य म्हणाले, सतत प्रवास करुन गावोगावी वृत्तपत्र पोहचविण्याचे काम करणारे वितरण अधिकारी जोखीम पत्कारुन सेवा देतात. अनेक अडचणींचा सामना करुन त्यांचे चोवीस तास काम सुरु असते. कोरोनानंतर वृत्तपत्र खपाचे प्रमाण कमी झाले असताना सामुदायिक पध्दतीने यासाठी मोहिम राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संतोष बडवे म्हणाले, वाचन संस्कृती टिकवण्याचे काम वृत्तपत्र करत आहे. या दृष्टीने विचार होण्याची गरज आहे. आजही प्रगत देशात वृत्तपत्र विकले जातात, याची सवय लावण्याची गरज आहे. वितरण हे दुर्लक्षित राहिलेला विभाग असून, त्यांचे प्रश्‍न सोडवण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा याचा फटका वृत्तपत्राला बसेल.

कांतीलाल पुरोहित यांनी राना-वनात वितरण अधिकारी सेवा देतात. ज्या गावाची बातमी आहे, त्या गावात अंकच पोहोचला नाही तर त्या बातमीला अर्थ उरत नाही. मॅनेजमेंटच्या उंचावलेल्या अपेक्षा व एजंटांचा प्रतिसाद यामध्ये समतोल साधण्याचे काम वितरण अधिकारी करत असतात.

प्रत्येकाकडे विनंती घेऊन काम करणाऱ्या वितरण अधिकारी यांचा सन्मान हिरावला गेला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत नवले यांनी केले. डिजीटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांनी आभार मानले.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !