आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा
ॲड. उमेश अनपट (नाशिक) : मराठा आरक्षण प्रश्नी 16 तारखेला विशेष अधिवेशन बोलावू, असा विश्वास देऊन कपटी सरकारने मराठ्यांचा विश्वासघात केला. मुंबईत धडकणारा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठ्यांची महाकाय पदयात्रा रोखण्यासाठी वाशित खेळला गेलेला हा कुटील डाव आता उघड झालाय. मात्र, तरीही न डगमगता समाजासाठी मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःच्या कुटुंबाची परवा न करता पुन्हा उपोषण सुरू करून आपला जीव अक्षरशः धोक्यात घातलाय.
जरांगे यांची खालावलेली तब्ब्यत पाहता, मात्र आता या सरकारची तहान, भूक, झोप उडायची वेळ आलीय. जरांगेंसारख्या लढवय्या नेतृत्वाचे मावळे किती कट्टर आहेत, हे दाखवून देण्याची वेळ आलीय. उठ मराठ्या जागा हो, जरांगेंच्या विचारांचा धागा हो", अशी हाकाटी महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात, दरी कपारीतून सर्वदूर घुमविण्याची वेळ आलीय
या मतलबी जगात मनोज जरांगेंसारखा माणूस होणे नाही. समाजासाठी खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावलीय. माझ्या वीस वर्षाच्या पत्रकारितेच्या कारकीर्दीत सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्यांच्या सारखा एकही निस्वार्थी माणूस पहायला नाही मिळाला. एका देखील व्यक्ती सोबत फोटो देखील काढावासा कधी वाटला नाही.
मराठ्यांचा 'आयडॉल ' : मागील आठवड्यात 8 फेब्रुवारी रोजी ते नाशिकला आले त्यावेळी त्यांना भेटण्याचा योग आला. त्यांच्यासोबत नाशिक ते वणी जाण्याचा योग आला. आयुष्यात पहिल्यांदा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या या पहिल्यावहिल्या व्यक्तीसोबत फोटो काढण्याचा मोह आवरु शकलो नाही. त्यांच्या गाडीच्या ताफ्याभोवतालची गर्दी भेदत जवळ पोहचून हातात हात देऊन त्यांना अभिवादन केले. तसेच मुलाला तुम्हाला भेटायचेय असे सांगितल्यावर त्याचे हातात हात घेऊन त्यांनी आशिर्वाद दिला. माझ्या मुलांचा, एकूणच मराठी मुलांचा 'आयडॉल' जरांगे सारखं निःस्वार्थ व्यक्तिमत्व असावं, असं मला वाटतं.
जीव ओवाळून टाकावं असं नेतृत्व : नाशिक ते वणी प्रवासात लोक त्यांच्यावर अक्षरशः जीव ओवाळून टाकत होते. याची देहा याची डोळा हा कौतुक सोहळा पाहून धन्य झाल्यासारखं वाटलं. जरांगे यांच्यावरील शुभेच्छा वृष्टिने सत्याची किंमत अजूनही कायम असल्याचे अधोरेखित झाले. याचे प्रत्यक्ष साक्षीदार झाल्याने जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले. केवळ मराठा म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणून या व्यक्तीपुढे नतमस्तक व्हावे वाटते. छत्रपती शिवाजी महाराज, आई - वडील यांच्यानंतर ही मनातील भावना फक्त याच व्यक्तीसाठी जागृत होते.
कठोर तपश्चर्या : केवळ समाजाला न्याय देण्यासाठी स्वतःच्या शरीराला अनंत यातना देऊन कठोर तपश्चर्या करत आहे हा माणूस. आपल्या कुटुंबाच्या भवितव्याची तमा न बाळगता आपल्या समाजाला दिलेल्या वाचनासाठी अहोरात्र झटतोय हा माणूस. किती मोठा हा त्याग.
राजकारण्यांचा कुटील डाव : राजकारणी मंडळी मात्र खुर्चीसाठी, स्वार्थासाठी त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळतंय. या राजकीय दुष्टचक्रात मराठ्यांच्या या भूतो न भविष्यती अशा अनमोल नेतृत्वाचा बहुमोल जीव सापडलाय. मराठ्यांनो लाख गेले तरी बेहत्तर पण हा कोटींचा पोशिंदा जायला नको.
असं नेतृत्व होणे नाही : हे नेतृत्व राहिलं तर मराठ्याची आण, बान, आणि शान कायम राहील. त्यासाठी वाट्टेल ते करा, मात्र आता या सरकारची तहान, भूक, झोप उडायला हवी. जरांगेंसारख्या लढवय्या नेतृत्वाचे मावळे किती कट्टर आहेत हे दाखवून देण्याची वेळ आलीय. त्यामुळे "उठ मराठ्या जागा हो, जरांगे पाटलांच्या विचारांचा धागा हो..!", ही हाकाटी महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात, दरी कपारीत सर्वदूर घुमविण्यासाठी प्रत्येक मराठ्याने सज्ज व्हावे.