आपल्या आनंदाची गुरुकिल्ली असते आपल्याच मनात..!


हल्ली टीव्हीवर मालिकांमध्ये इतकं झगझगीत आयुष्य दाखवतात ज्याचा वास्तवाशी काही संबंध नसतो. हे पाहून नव्या पिढीला आपलं आयुष्य असंच असावं, असं वाटतं आणि आपल्या वास्तवाशी नाते संपून जाते. आपण उगाच तुलना करत राहतो.


अनेकदा दुसऱ्याचं आयुष्य किंवा जगणं बघून आपण आपल्या आयुष्याचं मोजमाप करायला लागतो. जगण्याचे निकष दुसऱ्यांच्या आनंदावर ठरवायला लागतो. दुसऱ्याला मिळणारा प्रत्येक आनंद बघून आपण स्वतःच्या दुःखाची मोजदाद करायला लागतो.

प्रत्यक्षात त्याही माणसांना प्रॉब्लेम असतातच, पण माणसं सुखी माणसाचा मुखवटा घालून समाजात वावरत असतात. अर्थात ते चुकीचे नाही, पण लोकं दुसऱ्याच्या आयुष्याशी तुलना करुन स्वतःला फार दु:खी, बिच्चारा समजत रहातात आणि दु:खी होत रहातात.

सतत तुलनात्मक जगताना कोणताच आनंद निखळ, निर्मळ राहात नाही, अपूर्णतेचं असमाधान बोचत राहातं. खरं तर अपूर्ण असणेही समाधानी असतं, कारण पूर्णतेला वाव असतो. पण आपण फक्त फोकस अपूर्णत्त्वावरच करतो. पूर्ण झालेल्या गोष्टी नजरेआड होतात.

ह्या असमाधानाला आपली सतत इतरांशी 'तुलना' जबाबदार असते. खरं तर आपल्या आयुष्याची पकड आपल्याच हातात असली पाहिजे, त्यासाठी स्वतःच्या क्षमतांचा, मर्यादांचा विचार हवा. एकदा का स्वतःची मर्यादा आणि क्षमतांचा विचार आपण करू शकलो की आयुष्याकडून नक्की काय हवंय ह्याची समज येते आणि मग 'फोकस' होऊन जगता येतं.

अपूर्णत्व आहे, असं वाटणाऱ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी 'जी जानसे' मेहनत करावी. त्यासाठी मनाची तयारी होते. स्वतःचे ध्येय ठरवता येतात आणि त्याप्रमाणे तिथे पोचायचा कालावधीही स्वतःच्या क्षमतेनुसार ठरवता येतो. यामध्ये फक्त  स्वतःवर 'फोकस' राहिल्याने पुढे जाणं सोपं आणि समाधानी होतं.

समाधानी दिसणारं, आनंदी दिसणारं प्रत्येक आयुष्यं तसंच असतं असं नाही. प्रत्येकाला असणारे दुःखाचे डोंगर जो तो आपल्या परीने पार करतच असतो. आपल्या आनंदाची गुरूकिल्ली आपल्याच मनात असते. तेव्हा रहा आनंदी तुलनेच्या जाळ्यात न अडकता..!

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !