आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा
नाशिक - आपल्या पाल्याचा पहिलीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने पहिलीतील प्रवेशाचे वय बदलले आहे. केंद्राने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी मुलाचे वय ६ वर्षे इतके निश्चित करावे, असे निर्देश दिले आहेत.
शिक्षण मंत्रालयाने पाठवलेल्या पत्रात पहिलीत प्रवेश घेण्याची वयोमर्यादा 6 वर्षे इतके निश्चित करण्याचा आदेश देण्यात आला आहे. ही वयोमर्यादा NEP 2020 अंतर्गत प्रस्तावित आहे, यावर गेल्या वर्षी देखील चर्चा झाली होती. गेल्यावर्षीही असेच पत्र पाठवण्यात आले होते, आता सरकारने पुन्हा एकदा शाळांना आठवण करुन दिली आहे.
पत्रात काय म्हटलय? : जॉइंट सेक्रेटरी अर्चना शर्मा अवस्थी यांनी राज्यांना हे पत्र पाठवले आहे. यात त्यांनी म्हटले की, 'नवीन शैक्षणिक सत्र 2024-25 लवकरच सुरू होणार आहे, त्यामुळे प्रवेश प्रक्रियाही सुरू होणार आहे. आम्हाला आशा आहे की तुमच्या राज्य/ केंद्रशासित प्रदेशात ग्रेड-1 प्रवेशाचे वय 6+ वर ठेवले जाईल.'
राज्य सरकारला निर्देश : अर्चना शर्मा अवस्थी यांनी या पत्रात पुढे सांगितले की, या पत्राची प्रत्येक सरकारने दखल घ्यावी. राज्य सरकारने शाळांना पत्र लिहुन याची माहिती द्यावी, तसेच याबाबत सुचना तयार करुन त्या लवकरात लवकर शाळांपर्यंत पोहोच कराव्यात.
सहा वर्षे पूर्ण हवे : केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता सहा वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळणार नाही. याआधी खाजगी शाळांमध्ये कमी वयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जायचा यामुळे विद्यार्थ्यांवर कमी वयात अभ्यासाचा भार पडायचा. यामुळे अनेकांना बालपण अनुभवायला मिळत नव्हते. तसेस विद्यार्थ्यांच्या मेंदूच्या विकासावरही परिणाम व्हायचा.
सरकारी नोकरीशी संबंध : दरम्यान, याआधी पहिलीत प्रवेश घेण्यासाठी प्रत्येक राज्यात वेगवेगळी वयोमर्यादा होती. काही राज्यांमध्ये पाच वर्षांच्या मुलाला पहिलीत प्रवेश दिला जायचा. त्यामुळे या मुलांची पदवी इतर राज्यातील मुलांच्या तुलनेत एक वर्ष आधी पूर्ण व्हायची. त्यामुळे असे विद्यार्थी सरकारी नोकर भरतीसाठी इतरांच्या तुलनेत एक वर्ष आधी पात्र ठरायचे. याचा अर्थ या मुलांना सरकारी भरतीसाठी एक अटेंप्ट जास्त मिळायचा. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पहिलीच्या प्रवेशाची वयोमर्यादा संपूर्ण देशात एकसारखी असावी, अशी मागणी अनेकांनी केली होती.