तुम्हाला ठाऊक आहे का, 'यश' या शब्दाची नेमकी परिभाषा कोणती..?


‘यश-अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत’, ‘अपयशाचा डोंगर चढून गेल्यावर यश मिळते’, अशा प्रकारचे वाक्यप्रचार समाजमानसात विपुल प्रमाणात प्रचलित आहेत. सर्वसाधारण पद्धतीने पाहिले तर आपल्याला या वाक्यप्रचारामागे जो वाईट परिस्थितीत आहे किंवा अपयशाने त्रस्त आहे अशा व्यक्तीला यशापर्यंत पोहचण्यासाठी प्रेरणा मिळावी, हा उद्देश दिसून येतो.


एकंदरीत आपल्या आसपास सगळेच यशाचाच विचार करतात आणि त्यांनी तो का करू नये..? कारण 'यश' हेच त्यांच्या जगण्याला एक निश्चित दिशा देत असते. भविष्याला सुखरूप करत असते... पण यश हे सगळ्यांनाच जसे अपेक्षित आहे तसे मिळत नाही.

काहीना यश जसे आहे तसे मिळते.. तर काहीना थोड्या-अधिक प्रमाणात मिळते. तर काहीना ते मिळतच नाही. पण आपण यशाचा गवगवा इतका करून ठेवला आहे, की प्रत्येकाला यशाची चव चाखायची असते. इथेच 'मोटिव्हेशन' नामक एक प्रक्रिया आपल्या डोक्यात खूळ धरते.

यातूनच आपण यशस्वी लोकांचे आयुष्य तपासू लागतो. त्यांची चरित्रे-आत्मचरित्रे वाचू लागतो. वेगवेगळ्या माध्यमांवर किंवा समाजमाध्यमांवर असलेल्या त्याच्या मुलाखती वाचू-बघू लागतो. आपणही त्यांच्याप्रमाणे कष्ट करू आणि यशस्वी होऊ, अशी स्वप्न पाहू लागतो.. 

पण नेमके आपण त्यांच्या आयुष्याशी संबधित संदर्भ तपासायचे विसरतो. उदाहरणार्थ : एखादा अभिनेता खूप वर्ष संघर्ष करून खूप नाव कमावतो... खूप मोठा सुपरस्टार बनतो. त्याला पाहून काही लोकांना वाटते की हा आपल्यासारख्याच परिस्थितीतून गेला आहे... म्हणजे हा होऊ शकतो, तर मी काही नाही..?

मग मुंबईत रोज लोंढेच्या लोंढे सुपरस्टार होण्यासाठी येऊ लागतात. पण त्याच्यातला अभिनय हा 'फॅक्टर' तपासला जात नाही. ज्यांना अभिनय चांगला येतो अशांना योग्य संधी मिळत नाही. त्यामुळे एकतर त्यांना आयुष्यभर मिळेल त्या छोट्या मोठ्या कामांमध्येच अडकून पडावे लागते.. किंवा काम मिळाले नाही म्हणून परत जिथून आले तिकडे जावे लागते.

स्पर्धा परीक्षांमध्येही हीच बाब दिसून येते. जागा असत्तात मोजक्या आणि त्या जागांवर विराजमान होण्यासाठी इच्छुकांची संख्या आहे त्या  जागांपेक्षा हजारोपटीने जास्त.. साहजिकच त्यांची निराशा ठरलेलीच आहे.

'यश' हे सगळ्यांना सारख्याच प्रमाणात मिळेल ही अपेक्षाच चुकीची आहे. मुळात 'यश' या शब्दाची परिभाषाच चुकीची आहे असे वाटते. आपल्याला जे हवे आहे, ते मिळवण्यासाठी प्रयत्नवत राहणे.. अन 'यश' नाही मिळाले, तरी आपल्या चेहऱ्यावरील हास्य अन आपली जगण्याची उमेद कधीच मावळू न देणे, हेच खरं जगणं..!

- सचिन धोत्रे (दैठणे गुंजाळ, पारनेर, अहमदनगर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !