येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा
योगिता सूर्यवंशी (अहमदनगर) - स्नेहालय संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नव वर्षात संस्थेचे सुकाणू महिलांच्या आणि अन्य लाभार्थी गटांच्या हाती सोपविण्यात आले आहे. मागील अडीच दशके लालबत्ती भागातील महिलांचे संघटन, आरोग्य आणि सक्षमीकरणासाठी कार्यरत विश्वस्त जयाताई जोगदंड यांची अध्यक्षपदी एकमताने निवड झाली.
सचिव म्हणून डॉ. प्रीती भोंबे, खजिनदारपदी गीता कौर तर उपाध्यक्ष म्हणून बालरोगतज्ञ डॉ.शेहनाझ आयुब यांनी संस्थेची जबाबदारी स्विकारली. डॉ. स्वाती घुले,मनीषा गुगळे, मुग्धा शुक्रे, रूपाली मूनोत, सपना असावा, वैशाली चोपडा, डॉ. अंशू मुळे, ॲड.अनघा बंदिश्टी, शिल्पा चंदगडकर यांनी विश्वस्त म्हणून संस्थेच्या विविध प्रकल्पांच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या.
विश्वस्त मंडळात 13 महिला तर 8 पुरुष सदस्य आहेत. यात अरुण शेठ, नरेंद्र फिरोदिया, राजीव गुजर आणि किरीटी मोरे हे उद्योजक आहेत. राजीव कुमार सिंग आणि अजित थदानी हे संगणक तज्ञ आहेत. शशिकांत सातभाई हे व्यवस्थापन तर प्रवीण कटारिया हे अर्थतज्ञ आहेत.
स्नेहालयाच्या स्थापनेपासूनच वंचित आणि शोषित महिला, तृतीयपंथी आणि समलैंगिक गट, एचआयव्ही बाधीत, अनाथ - निराधार - एक पालक गटातील माजी विद्यार्थी स्नेहालयचे आजीव सदस्य आणि विश्वस्त होते. लता पवार, अंजनाबाई सोनवणे, गीता मोरे, शबाना शेख, कांताताई काळे, रेणुका कांबळे, आदी महिलांनी स्नेहालयाची विविध पदे भूषवली.
प्रथमच जयाताई जोगदंड यांच्या रूपाने संस्थेची सर्व सूत्र पूर्व लाभार्थ्यांकडून सोपवण्यात आली आहेत. निमंत्रित विश्वस्त आणि सल्लागार म्हणून 150 सदस्यांना यंदा स्नेहालयाच्या कार्यात सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यात कायदा - व्यवस्थापन - महिला आणि बालविकास - शारीरिक आणि मानसिक आरोग्य - पर्यावरण - सेंद्रिय शेती - ग्रामविकास - रोजगार शिक्षण - सेवा कार्य प्रशिक्षण - ज्येष्ठ नागरिक - अर्थकारण - नागरीकरण आणि झोपडपट्टी विकास - दिव्यांगांचे प्रश्र्न या विषयातील जाणकारांचा समावेश आहे.
अन्य कोणाच्या नशीबी हे दुःख येऊ नये हीच भावना आपली कार्यप्रेरणा आहे. स्नेहालयच्या कामात मागील वर्षापासून शशिकांत सातभाई यांच्या मार्गदर्शनाखाली अमुलाग्र परिवर्तन करण्यात आल्याचे सांगून जयाताई म्हणाल्या की, स्नेहालयच्या नवीन कार्यशैलीला स्नेहालय 2.0 असे संबोधण्यात आले आहे.
उच्च गुणवत्ता, कार्यक्षमता, गतिमान प्रतिसाद, संपूर्ण पारदर्शकता आणि प्रत्येक कामातील अनुपालन ( Compliance) या पंचसूत्रीच्या आधारे स्नेहालय कार्यरत राहणार असल्याचे जोगदंड यांनी सांगितले. इतर नवोदित संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण - सक्षमीकरण यावर स्नेहालय विशेष लक्ष देणार असल्याचे नूतन सचिव डॉ. भोंबे म्हणाल्या.
सर्वश्री मिलिंद कुलकर्णी, संजय गुगळे, सुवालाल शिंगवी, फिरोज तांबटकर, राजीव गुजर, बेहराम नगरवाला, संगीता शेलार, अनिता अजित माने, मीरा क्षीरसागर ,शुभांगी कोपरकर यांच्या संवाद आणि समन्वयातून स्नेहालयची नवी टीम निर्माण झाली आहे.