छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार न करता विचारांचाही अंगिकार व्हावा


छत्रपती शिवाजी महाराजांवर राजमाता जिजाऊ आईसाहेबांनी केलेले संस्कार यातून छत्रपतींसारखे असामान्य व्यक्तिमत्व उभे राहिले. महाराज एकमेव असे सम्राट होते की राजांच्या... संभाजीराजांच्या दरबारात स्त्री नर्तकी कधीही नव्हत्या. त्यांना ध्यास फक्त स्वराज्याचाच होता.


स्त्रीयांवर मोगलांकडून होणारे अत्याचार पाहून त्याचं बालमन सतत पेटून उठत असे. संवेदनशील आणि अत्यंत पराक्रमी असलेले राजे बालवयातच २८ जानेवारी १६४५ रोजी रांझ्याच्या पाटलाचा न्यायनिवाडा करतात... तेव्हाच त्यांची स्त्रीकडे पहाण्याची ठाम दृष्टी दिसून येते.

दक्षिण भारताची महत्वांकांक्षी मोहिम संपवून येताना कर्नाटकातील बेलवाडी येथील ईशप्रभु देसाई महाराजांना शरण येत नाहीत. उलट मराठ्यांचे रसद नेणारे ४०९ बैल पळवून नेतात. सखोजी गायकवाड तिथे युध्द फळी संभाळत असतात.. या युध्दधुमचक्रीत ईशप्रभु देसाई मारले जातात.

त्यांची पत्नी सावित्रीबाई आणि बेलवडीच्या इतर स्त्रीयाही पुरुषाच्या बरोबरीने युध्द करु लागतात. तेव्हा स्वतः तोरगळहून महाराज तिथे पोहचतात. आणि सावित्रीबाई देसाई युध्द हरतात तेव्हा सखोजी गायकवाड सावित्रीबाईंना अल्पवयीन पुत्रासह अटक करुन महाराजांसमोर हजर करतात..

सावित्रीबाईंना आता आपल्याला शिक्षा होणार असे वाटत असतानाच महाराज त्यांच्या गढीसह आजूबाजूचा प्रदेशही तिला बहिण मानून तिच्या बाळासाठी भेट देतात (एप्रिल १६७८). जेव्हा सखोजींनी सावित्रीबाईंच्यावर अटक केल्यावर बदनजर ठेवल्याचे कळते तेव्हा ते संतापतात.. सखोजीचे डोळे काढण्याचा हूकूम फर्मावतात.

या घटनेने सावित्रीबाई भारावून जातात. बेलवाडीजवळ यादवाड या गांवात शिवरायांचे छोटे मंदिर उभे करतात आणि शिवरायांबद्दल कृतज्ञताभाव व्यक्त करतात. इथे शिवरायांनी शत्रुपत्नीला मानाने वागवून अवघ्या कर्नाटक प्रांताचे मन जिंकले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतंत्र प्रज्ञेने कर्तबगारी गाजवणाऱ्या स्त्रीयांच्या राजकीय भूमिका आणि विचार फारच लक्षणीय आहेत. शहाजीराजांची बुध्दिमान पत्नी एवढ्यापुरतेच स्वतःचे जगणे मर्यादित न ठेवता दक्षिणेत स्वराज्य संकल्पना जिजाऊ आईसाहेब जगल्या. शिवाजी महाराजांच्या हातून ती संकल्पना साक्षात करवली.

शिवछत्रपतींना घडविणे आणि स्वराज्याच्या विचारांना प्रेरित करुन सर्वतोपरि पाठबळ देणे एवढ्यावर जिजाऊ आईसाहेबांचे कर्तृत्व संपत नाही. स्वराज्य म्हणजे प्रजा आणि तिचे कल्याण, हा संस्कार त्यांनी महाराजांच्या रोमारोमात उतरवला होता.

शिवाजी महाराजांच्या प्रेरणास्थान तर त्या होत्याच पण आद्य आणि महत्वाच्या सल्लागार म्हणूनही जिजाऊ आईसाहेबांचे महत्त्वाचे स्थान आहे. शिवाजीराजेंच्या आग्रा भेटीच्या वेळी राज्याची जबाबदारी समर्थपणे संभाळत होत्या.

मोगलांचे आक्रमण हा स्वराज्यासाठी कायमचा धोका होता. आक्रमणाला तोंड द्यायचे तर सत्ता सांभाळणाऱ्यांची निष्ठा आणि एकजूट जरुरी होती. पैसा आणि सैन्यबळ अपुरी असल्याची वस्तुस्थिती महाराजांनी आणि जिजाऊ आईसाहेबांनी स्विकारली होती. आणि शिवाजी महाराजांनी लोकसंग्रह वाढविण्यावर भर दिला होता.

जिजाऊ आईसाहेब आणि महाराजांनी एक संपूर्ण आणि प्रगल्भ व्यक्तिमत्व घडविले. ती व्यक्ति म्हणजे स्वराज्यातील दुसऱ्या महाराणी येसुबाईसाहेब. पिलाजीराव राघोजीराव राजेशिर्के या प्रतिष्ठित घराण्यातील कन्या.. शंभूराजे आठ-नऊ वर्षाचे असताना येसूबाईंच्या बरोबर त्यांचे लग्न झाले होते.

लग्नानंतर रायगडीच असल्याने जिजाऊ आणि शिवाजीमहाराजांचे संस्कारांनी येसूबाईंना धैर्यशील आणि ठाम बनविले. संकटाच्या आणि युध्दाच्या मालिकांनी येसूबाईंना कर्तव्यदक्ष राज्यकारभारी बनविले होते. म्हणून संभाजी महाराजांना येसूबाईंनी समर्थपणे साथ दिली.

छत्रपतीं संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही मन मोठे करुन राजारामराजेंना राज्याभिषेक केला. त्यांचे प्राण रक्षण व्हावे म्हणून कुंटूबकबिल्यासह जिंजीला पाठवले. संभाजीराजांनी त्या उत्तम न्यायनिवाडा करीत, अचूक निर्णयशक्ति पाहूनच त्यांना कुलमुखत्यार केले होते.

आणि त्यांच्या नांवाचा "श्री सखी राज्ञी जयती" असा स्वतंत्र शिक्का करुन दिला होता. संभाजी महाराजांच्या अनुपस्थितीत स्वराज्यातील वाद-विवाद, तंटे, स्वराज्याचा राज्यकारभार, न्याय-निवाडे त्या सदरेवर बसून कुशलतेने संभाळण्याऱ्या कुशल राजनेत्या होत्या.

शिवाजी महाराजांनी स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्व ठेवले होते.. त्याबरोबरच त्यांना मानही दिला होता. आपल्या सर्व पत्नींना ते सन्मानानेच वागवत.

राज्याभिषेकानंतर एक जिवाजी नांवाच्या सैनिकाची दूध घालायला येणारी हिरकणी गवळण रायगडावर कोजागिरी पोर्णिमेच्या संध्याकाळी दूध घालायला येते. नियमानुसारच गडाचे दरवाजे बंद होतात. ज्या कड्यावरुन पाणीसुध्दा अडखळत जाऊ शकते अशा कड्यावरुन आपल्या बाळासाठी ही कोवळी पोर तब्बल २७०० फूट बुरुज उतरुन अद्भुत कामगिरी करते.

हे महाराजांना कळत तेव्हा ते या आईच्या धाडसाने चकीत होतात. गडावर पालखी पाठवून या महाराष्ट्राच्या लेकीला दरबारी बोलवतात आणि तिला सोन्याचं मानाचं कडं, चोळीबांगडी देऊन सन्मान करतात. महाराज एवढ्यावरच थांबत नाहीत. त्या अवघड बुरुजाला "हिरकणी बुरुज" असं नांव देऊन तिच्या पराक्रमाचा सन्मान करतात.

शिवाजी महाराज म्हणजे एक विचार होता. त्यांचे स्त्रीविषयक धोरण असो, पर्यावरण धोरण, अर्थकारण असो.. किंवा राजकारण असो. यात ते एका अमर्याद उंचीवर होते. हे निर्विवाद सत्य आहे.

आजकाल विरोधी पक्षातील स्त्रियांना अतिशय खालच्या दर्जाला जाऊन ट्रोल केले जाते तेव्हा निश्चितच महाराजांच्या या स्त्रीविषयक विचांराची आठवण येते अन हात नम्रपणे जोडले जातात... नुसता शिवाजी महाराजांंच्या नावाचा जयजयकार न करता त्यांच्या विचारांचा अंगिकार केला पाहिजे हेच अंतिम सत्य.!

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !