येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा
मुलांना जन्म दिला की आपण पालक होतो का..? खरंतर मुलांबरोबर आपलाही पालकत्वाचा प्रवास सुरू होतो. खरंतर यात कठीण असे काही नसते. फक्त आपल्याला पालकत्वाशी निगडित काही मूलभूत गोष्टी समजून घ्यायला हव्यात. पालक म्हणून आपण मुलांना वाढवताना आपल्याकडून होणाऱ्या चुका टाळता येणं जमायला हवं.
- त्यांचं भावविश्व समजून घ्यायला हवे... तुमच्या समोर त्यांनी मोकळेपणाने प्रश्न विचारले पाहिजेत. तुम्हीही हे याला कशाला हवं... हे न म्हणता शांतपणे त्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायला हवीत. उदा. हाॅर्मोनल चेजेस, फिजिकल चेजेंस यामुळे मुलांना साहजिकच मनात शंका येतात तर मुलामुलींचे मित्र बनून बोलण्याचा प्रयत्न करावा.
सतत तुमच्या भूतकाळाशी त्यांची बरोबरी करू नका. आमच्या वेळी आमचा बाप असा झोडपून काढत होता, अशा रेकॉर्ड तर अजिबात लावू नका. मुलांची त्याच्या भावंडांशी किंवा इतर मुलांशी अजिबात तुलना करु नका. यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास कमी होतो आणि ज्यांच्या बरोबर तुलना होते त्यांचा मुलं दु:स्वास करु लागतात.
- मुलांमध्ये आत्मविश्वास, महत्वाकांक्षा,आत्मप्रतिमा जरुर निर्माण करा.आत्मप्रतिमा तयार करायला मदत करायला हवी कारण स्वतः असे असे आहोत असे मुलांना समजले की मुलं त्या प्रतिमेला जपायचा प्रयत्न करत राहतील. यासाठी त्यांच्या मनातील प्रेम आणि सद्भावना जागृत करायला हवी.
मुलांमध्ये अति नको पण महत्वाकांक्षा हवीच. त्यांनी स्वप्न पहायला हवीत ती स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी कृती केली पाहिजे.
- अभ्यास करायची त्यांची पध्दत कशी आहे? नुसते पाठ करतात की धडा समजून घेऊन उत्तरे तयार करतात याकडे पालक आणि शिक्षकांनी लक्ष दिले पाहिजे.त्यांना विषय समजून घेऊन उत्तरे तयार करण्यासाठी उद्युक्त केले पाहिजे.
- आता सर्वात महत्वाचा विषय... आपल्या आयुष्यातील ३ इडियट्स कोण आहेत..? टी.व्ही., मोबाईल, इंटरनेट. ह्या ३ इडियट्सची खरंतर गरज आहे. पण अतिवापर घातक आहे, तो टाळता यायला हवा.
मुलांनी टी. व्ही.पाहू नये, असे अजिबात म्हणणार नाही. पण ती वेळ ठराविक असायला हवी. पूर्वी संध्याकाळी शुभंकरोती, रामरक्षा, परवचा म्हणायची पध्दत होती. पण हल्ली ते कालबाह्य झाले आहे. पण संध्याकाळी आपण मुलांना दहा मिनिटे देऊन निदान त्यांच्याशी गप्पा तरी मारु शकतो ना...!
तुमच्याशी तुमच्या मुलांना बोलावंसं वाटणं यात तुमचं पालक म्हणून यश आहे. मुलांच्या मोबाईल किंवा इंटरनेट वापराकडे लक्ष द्यायला हवे. नेमके ते काय पहातात. याकडे आपले बारीक लक्ष हवे. आपल्या उपकरणांवरील माहिती नकळत मुलांकडून दुसरीकडे शेअर होत नाही ना हे सतत तपासत राहावे. यात तुमचा फार वेळ जाणार नाही.
- मुलं, मुली प्युबर्टी वयात जास्त संवेदनशील असतात. त्यांच्यात हाॅर्मोनल बदल होत असताना त्यांना विरुद्ध लिंगी व्यक्तींविषयी आकर्षण निर्माण होणे, हे नैसर्गिक आहे. याविषयी मुलामुलींना जागरूक करुन त्या वयात त्यांना त्यांच्या छंदाकडे, वाचनाकडे, करिअरच्या संधीकडे वळवणे अतिशय आवश्यक असते. उडणाऱ्या फुलपाखरांना उडायला तर द्यायचे पण योग्य दिशेने. आपण पालक म्हणून एवढं तर करू शकतोच ना..?
- वेळ .... हल्ली आयुष्य वेगवान झाले आहे. पालकांना मुलांसाठी वेळ काढणे, देणे थोडे अवघड झाले आहे. हे एकदम मान्य. पण आठवड्यातून एकदा तरी आपण पूर्ण दिवस मुलांना देऊन त्यांच्याशी गप्पा माराव्यात, त्यांना बोलत करून आपण गुड लिसनर व्हावे... म्हणजे त्यांना काय हवे हे आपल्याला कळेल.
या सहासुत्रींचा वापर करून आपण चांगले पालक होऊ शकतो. मग होणार ना चांगले पालक..?
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
लेखिका सखीसंपदा मासिकाच्या संपादक आहेत.