'माईलस्टोन' स्नेहसंमेलन : देशातील कर्मचाऱ्यांना 'यांनी' दिली दिशा

हा व्हिडिओ पहा आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा

(ॲड. उमेश अनपट), ठाणे : एकाच विभागात किंवा ऑफिसात अनेक वर्ष एकत्र काम करून देखील एकमेकांची सुख- दुःख जाणून घेण्यासाठी फुरसत काही मिळत नाही, ही विविध सरकारी, निमसरकारी खासगी कार्यालयातील परिस्थिती. 


(व्हिडिओ पहा व चॅनल सबस्क्राईब करा)

मात्र, कोंकण परिक्षेत्रातील विविध पोलीस कार्यालयातील आजी - माजी मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी या धकाधकीच्या जीवनात देखील आवर्जून वेळात वेळ काढून नित्याने भरवत असलेले स्नेहसंमेलन राज्यातीलच नव्हे तर देशातील शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालयातील अधिकारी - कर्मचाऱ्यांसाठी जीवन प्रवासाला दिशा देणारे एक मार्गदर्शक 'माईलस्टोन' ठरू शकेल


एकत्र काम करून देखील एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ मिळत नाही, तेंव्हा भेटण्यासाठी विशेष वेळ काढण्यासाठी गरज भासते आणि मग सर्वांना एकदाच आणि मनमोकळे भेटता यावे यासाठी खटाटोप सुरू होतो. आणि याचा परमोच्च बिंदू ठरतो तो प्रत्यक्ष स्नेह संमेलनाचे यशस्वी आयोजन. असेच एक आगळे वेगळे आणि विक्रमांची किनार असलेले कोंकण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सिध्दी हॉल, ठाणे पश्चिम येथे मोठया उत्साहात व दिमाखात हे अनोखे संमेलन पार पडले.

तीन पिढयांचा समावेश असलेले हे संमेलन अभूतपूर्व असा विक्रम बनवून गेले. या संमेलनामध्ये २३ वर्षापासुन ८० वर्षे वयाच्या कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश होता. संमेलनात १२ प्रशासकीय अधिकारी, ३३ कार्यालय अधीक्षक, ३२ प्रमुख लिपीक, दोन सहाय्यक लेखा अधिकारी, दोन स्वीय सहाय्यक तसेच इतर वरिष्ठ श्रेणी लिपीक, कनिष्ठ श्रेणी लिपीक व कार्यालयीन शिपाई अशा एकूण १८५ जणांनी सहभाग घेतला.


कार्यक्रमांची रेलचेल : सेवानिवृत्त ज्येष्ठ सदस्यांच्या हस्ते या संमेलनामध्ये दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गणेश वंदना, भावगीत, भजन, छत्रपती शिवाजी राजांचे गीत, ७५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या सदस्यांचा गौरव व सन्मान असे विविध कार्यक्रम पहिल्या सत्रात पार पडले.
कला - गुणांचे सादरीकरण : प्रमुख लिपीक एजाज शेख हे स्वतः गायक असुन त्यांचा स्वतः चा लाईव्ह ऑर्केस्ट्रा चालू झाल्यानंतर लावणी नृत्य, सोलो डान्स, ग्रुप डान्स हे कार्यक्रम पार पडत असतांना हॉल मधील उत्साह वाढतच होता. कविता वाचन, ग्रुप डान्स, गीत गायन करुन काही कलावंतांनी आपली कला सादर केली. श्वास व विचार या विषयावर गोरे साहेब यांनी व्याख्यान दिले.

सर्वांनी गिरविले 'वर्तणुकी'चे धडे : कार्यालयातील आपली वर्तणूक हा सर्वांच्या जिव्हाळयाचा विषय घेऊन वरिष्ठ श्रेणी लिपीक श्री गणेश देशमुख (परिपूर्ण शासकीय कर्मचारी कसे बनावे यासाठी निर्माण केलेल्या कर्मयोगी इंडीया या यू ट्यूब चॅनलचे संस्थापक) यांनी २० मिनिटांचे व्याख्यान दिले, जे सर्वांना भावले.

पोवाड्याने वेधले लक्ष : दुपारी स्वादिष्ट व रुचकर भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर या संमेलनाच्या कल्पनेचे जनक सेवानिवृत्त कार्यालय अधीक्षक अतुल जाधव यांच्या जीवनावर आधारीत, सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी सुनिल पवार व यशवंत पगारे लिखित पोवाडा सेवानिवृत्त प्रमुख लिपीक राजेंद्र सपकाळे यांनी व त्यांना कोरस देणाऱ्या चमूने खणखणीत आवाजात सादर केला.


कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरला, तो उपस्थित १८५ मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी यांचेपैकी सेवेत किंवा निवृत्तीनंतर उत्कृष्ठ कामगिरी करणारे हेमंत नेवकर, यशवंत पगारे व गणेश देशमुख या तीघांचा सन्मानचिन्ह व सम्मानपत्र देऊन केलेला सन्मान.

उभरते कलाकार हेमंत नेवकर : दिनांक ३० सप्टेंबर २०२३ रोजी स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतलेले कार्यालय अधीक्षक हेमंत नेवकर यांनी पावने तीन महिन्यातच स्वतःची आवड पूर्ण करण्याकरिता १० मालिका व दोन सिनेमांमध्ये छोटे छोटे काम करुन छोटया पडदयावरील उभरते कलाकार म्हणून जी प्रतिमा तयार केली त्याकरिता त्यांचा आयोजन समितीने सन्मान केला.

गझलकार यशवंत पगारे : निवृत्तीनंतर कविता व गझल या क्षेत्रात गाजलेल्या, हृदयातील सुगंधी जखमा या गझल पुस्तकाचे लेखक तसेच अनेक पुरस्कारांनी महाराष्ट्रभर सन्मानीत असलेले सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे यांनी केलेल्या कामगिरीबाबत त्यांचाही सन्मान करण्यात आला.

सर्वोच्च मानकरी गणेश देशमुख : पोलीस प्रशिक्षण केंद्र, मरोळ, मुंबई येथे कार्यरत असलेल्या व पोलीस प्रशिक्षणात गुणवत्तापूर्ण कामगिरी केल्याबद्दल "Union Home Minister's Medal for Excellance in Police Training for 2021-2022" या पदकाने गौरविलेल्या गणेश सुभाष देशमुख यांचा उत्कृष्ठ कामगिरी म्हणून सन्मान करण्यात आला.

स्क्रीनवरील 'सेवाकाळा'ने आनंद द्विगुणित : संमेलनास उपस्थितांसह १९२ जणांचे नाव, हुद्दा, भरती तारिख, नियुक्तीचे कार्यालय, निवृत्त झाले असल्यास निवृत्तीचे कार्यालय व निवृत्तीची तारिख व सध्याचा फोटो याबाबतची संकलीत केलेली माहिती गणेश देशमुख यांनी प्रोजेक्टरद्वारे स्क्रीनवर दिवसभर दाखविली. प्रत्येकाची माहिती त्यांच्या फोटोसह हॉलमधील प्रत्येकाला दिसत होती. ही राबविली गेलेली अभिनव कल्पना सर्वांनाच भावली. तसेच तीन जणांच्या केलेल्या सन्मानाच्या वेळी भारदस्त आवाजात सत्कारमूर्तीच्या माहितीचे सुभाष निमजे यांनी केलेले वाचन तसेच या तीघांच्या कामगिरीबाबत देशमुख यांनी बनविलेले व त्यावेळी स्क्रीनवर प्रदर्शित केलेले व्हिडीओ हे सर्वांनाच आवडले.

या कार्यक्रमामध्ये निवेदक म्हणून उत्तम राणे यांनी उत्कृष्ठ कामगिरी बजावली. स्नेह संमेलनाच्या शेवटी ५० मिनीटे सर्वांना डीजेवर डान्स करुन मनमुराद आनंद घेण्याची संधी देण्यात आली. तसेच आलेल्या प्रत्येकाला एक आकर्षक भेटवस्तूही देण्यात आली.


संमेलनाची संकल्पना : सेवानिवृत्तीनंतर नेहमीच्या धावपळीच्या जीवनापासून दूर गेलेल्या व रुक्ष बनत चाललेल्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करणे. कार्यरत असलेल्या तरुण मंडळीचा दैनंदीन कामाचा वाढता व्याप, वाढत्या रिक्त पदांमुळे वाढत असलेला अतिरिक्त कामांचा ताण यामुळे तेही मानसिक तणावाखाली असतात. त्यामुळे त्यांनाही या गर्तेतून बाहेर काढून त्यांनाही मोकळेपणाचा श्वास एक दिवस का होईना घेता यावा.

मुहूर्तमेढ रोवणारे आधारस्तंभ : सेवानिवृत्त झालेले वरिष्ठ सहकारी आणि कार्यरत असलेले सहकारी यांना एकत्र आणून एक मजेशीर स्नेह संमेलन घडवून आणण्याचा विचार ८ वर्षांपूर्वी अतुल जाधव यांचे मनात आला. त्यांनी ही कल्पना हेमंत नेवकर, उत्तम राणे, प्राजक्ता भट आणि प्रमोद सांगळे यांना बोलून दाखविली. त्यांनी ही कल्पना उचलून धरली. या संकल्पनेची माहिती मातृभूमी ठाणे असलेल्या प्रमोद तांबुळकर, श्रध्दा पेडामकर, नियती देसाई, प्राची देऊळकर, चंदा देसाई, स्मिता दांडेकर, सुनिल पवार व प्रकाश जाधव यांना सांगितली. या सर्वांनी ही कल्पना उचलून धरली. यानंतर या आयोजकांनीच निधी जमा करुन दिनांक १२ मार्च २०१६ रोजी पहिल्या स्नेहसंमेलनाचे आयोजन केले. या संमेलनाला ४० जण उपस्थित होते. दुसरे स्नेह संमेलन उत्साहात सन २०१७ मध्ये पार पडले. त्यामध्ये ६० जण उपस्थित होते. दिनांक ०४ डिसेंबर २०२१ रोजी तिसरे स्नेह संमेलन पार पडले. त्यास जवळपास १२० जण उपस्थित होते. हाच उपस्थितीचा चढा आलेख कायम ठेवत या चौथ्या संमेलनामध्ये १८५ जण उपस्थित राहिले.
संमेलन आयोजनाचे शिलेदार : हे संमेलन यशस्वी करण्यासाठी खूप साऱ्यांची मेहनत व ताकद पणाला लागलेली होती. विशेष करुन अतुल जाधव, प्रमोद तांबुळकर, गणेश देशमुख, योगेंद्र गुप्ते, श्रध्दा पेडामकर, भारती सोनावणे, प्राची देऊळकर, नियती देसाई, प्रकाश जाधव, हेमंत नेवकर, चंदा देसाई, उत्तम राणे, अधिकराव निकम, सुनिल पवार, प्रमोद सांगळे, चंद्रकांत मुळे यांनी मेहनत घेतली. तसेच निलेश तांडेल, सतीश काटकर, किशोर सोनावणे, नितीन घोरपडे, वैभव संखे, अजित पाटील, जयू आयरे, अरुण अहिरे यांनीही त्यांचेवर सोपविलेल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !