आठवणींच्या हिंदोळ्यावर : मागे वळून पाहताना..


नववर्षाच्या आरंभाला सारे दुःख विसरुन जायचं म्हणते आहे.. ज्यांनी अपमानित करुन डोळ्यात पाणी आणलं, त्यांना आयुष्यातून वजा करायचे म्हणते आहे. खूप धावले आयुष्यामागे, आता निवांत जगेन म्हणते आहे.


यश-अपयश चाखले खूप, आता स्थितप्रज्ञ होईन म्हणते आहे. काही सख्यांच्या बेरंग आयुष्यात रंग भरेन म्हणते आहे. विखरुन गेले काही स्वर,
त्यांना सरगममध्ये बांधेन म्हणते आहे. दूर गेलेल्या आठवणींना शब्दात लिहीन म्हणते आहे.

निसर्गाची रंगीबेरंगी उधळण कागदावर चितारीन म्हणते आहे. फार जगले सर्वांसाठी स्वतःसाठी काही क्षण काढेन म्हणते आहे. साथ मिळाली तुम्हां सर्वांची, काही गाणी गावी म्हणते आहे..

दिवस संपत नाहीत, रात्री कित्ती मोठ्या वाटतात. वर्ष मात्र कशी पटापट संपतात ते कळत नाही. खूप काही ठरवले होते. काही पूर्ण झालेय, काही पूर्ण व्हायचे आहे. काहीजणांचा उगाचच अट्टाहास असतो, आमचे नववर्ष आम्ही पाडव्यालाच साजरे करणार..

संस्कृतीचा अनाठायी अभिमान अयोग्यच आहे. कॅलेंडर आपण इंग्रजी वापरणार.. वाढदिवसाला मेणबत्ती लावून केक कापणार. ड्युअल सिमच्या जमान्यात माणसही ड्युअल वागतात, हेच खरं.

घराघरात भिंतीवर नवीन कॅलेंडर विराजमान होतात. हे कॅलेंडर म्हणजे फक्त तारखा, वार, तिथी, सण, समारंभ एवढेच दाखवतात का..? खरंतर जाणारे वर्ष म्हणजे जे भलेबुरे घडून गेलेला भूतकाळ.. जो परत कधीच येणार नाही.

सर्वजण सांगतात भूतकाळ विसरा.. पण आपण भूतकाळ जगलेला असतो ना..? तो कधीतरी आपला वर्तमानच होता ना..? तेव्हा भूतकाळ म्हणजे आपला शिक्षकच असतो. त्यातूनच पुढे जगण्याची दिशा मिळत असते.

आंग्ल नववर्षाच्या संकल्पपूर्तीसाठी तुम्हा सुजनांना अनेक अनेक शुभेच्छा. शुभास्ते पंथान संतु.

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !