एकाने काटलेला,
कुणाचा कटलेला पतंग हवेत गिरक्या घेतं घेतं अलगद हातात आला...
कोणाच्या गच्चीवरून नाहीतर मैदानावरून झपकन हवेत असेल उडाला.
आकाशातील विहारात,
मजेत उडतांना काटा काटीच्या खेळात निशस्त्र झाला, अन्
तसाच परतीच्या वाटेवर निघतांना,
अलगद माझ्या हातात बिलगला...
खरं सांगू,माझं बालपण सोबत घेऊन येतांना,निरागस आठवणींवर स्वार होऊन आला होता..बाल मित्रांचा गलगलाट कानाला ऐकवतांना..पतंगाच्या खेळात धुळीने माखलेल्या पायांची सुखद आठवण देत होता..
पतंग...!
स्मृतींचा तो हिंदोळा होता
बालपणीच्या त्या अनवट क्षणांचा दुत होता...
अलगद हातावर स्थिरावला होता..
एक पतंग !
- जयंत येलुलकर (अहमदनगर)