म्हणून राजमाता जिजाऊ अनंतकाळापर्यंत दिशादर्शक असतील


आज माँ जिजाऊंचा जन्मदिन. महाराष्ट्रातला स्वराज्य देणाऱ्या शिवरायांसारख्या पराक्रमी जन्माला घालून अवघ्या महाराष्ट्रावर स्वराज्याचे छत्र धरणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊंची जयंती. जिजाऊ म्हणजे साक्षात दुर्गा..!

दुर्ग म्हणजे काय. समुद्रालगतच्या किल्ल्यांना दुर्ग म्हणतात. उदा. सिंधूदुर्ग. समुद्राच्या अनेक भीषण लाटांना वर्षानुवर्षे तटस्थ राहून टक्कर देणाऱ्या दुर्गाकडे आपण कित्ती विस्मयाने पहातो.

दुर्गाही तशीच असते ना पिढ्यानपिढ्या. आमची दुर्गा पुरुषसत्ताक पध्दतीच्या लाटांना टक्कर देत उभी आहे.. पूर्वपार चालत आलेली ही टक्कर अजूनही घराघरातील स्त्री देत आहे.

यवनांच्या अत्याचाराने भारतातील स्त्रीया मुले दीनवाणी झाली होती... अन इथली घराणी मात्र सत्तेच्या तुकड्यांसाठी यवनांची चाकरी करत होते. त्यावेळी यादव कुळात लखुजी जाधव यांच्या पोटी एक क्रांतीची ज्वाला जन्माला आली.. राष्ट्रमाता जिजाबाई...

आपला देश असूनही आपले राज्य का नाही ? ही जिजाऊंच्या मनात जळत असलेल्या क्रांतीच्या ज्वालेने आपल्या पराक्रमी पुत्राकडून स्वराज्य निर्मितीची क्रांती घडवून आणली. जिजाऊंनी नितिमत्तेचे पालन करणाऱ्यांचा विजय आणि अनितिने वागणाऱ्यांचा नाश हे सुत्र शिवरायांच्या मनावर ठसवले.

जिजाऊंना केवळ छत्रपती निर्माण करायचे नव्हते च तर साऱ्या मुलखाचा कायापालट करायचा होता. त्यांनी सरंजामशाहीला दूर सारुन पर्यायी  कृषीवल, बहुजनांची संरचना उभारली. उजाड झालेल्या पुणे परगण्याला, प्रजेला आईच्या मायेनं विश्वास दिला. आणि उजाड जमिनी लागवडीखाली आणण्यास प्रोत्साहन दिले.

आळंदीच्या ज्ञानदेवांच्या समाधीस पुजेअर्चेसाठी उत्पन्न दिले. याच काळात मता नावाच्या वृध्द महिलेला म्हातारपणीच्या उदरनिर्वाहासाठी अर्धा चावर वावर दिला असल्याचा उल्लेख आढळतो. अशा जागरुक पावलांनी मावळ खोऱ्याचा चेहरा बदलला.

आपल्या धोरणी दृष्टीतून शिवरायांच्या सोबत बारा बलुतेदारांना एकत्र आणले. सरंजाम,जहागीरदार यांच्यापेक्षा तानाजी, सुर्याजी, येसाजी, बाजी पासलकर असे सामान्यातील असामान्य हिरे गोळा केले.

ही वैचारिक उत्क्रांती होती. स्वराज्य स्थापना ही जुनी सत्ता उलथून नवी सत्ता आणणे एवढ्यावर मर्यादित नव्हती तर असहिष्णू आणि अनिती यावर उभारलेल्या दुष्ट सत्तेचा नाश होता. न्यायदानाचे कामही जिजाऊंनी कर्तव्यकठोरपणे केले आहे. प्रजेवर आपल्या मातृछायेचं छत्र धरणाऱ्या या कल्याणीस शत शत प्रणाम..!

वीर योध्दा असलेल्या शिवरायांची माता एवढी मर्यादित ओळख नाही, तर वीरयोध्दा, निस्पृह, न्यायाधीश, स्वराज्याची संरक्षक माता होत्या. सम्यक दृष्टी असलेल्या, चैतन्य, संघर्षाच्या मिलाफ असलेल्या जिजाऊंना जाणून घ्यावं लागेल, तेव्हाच आज पाचशे वर्षानंतर आणि यापुढे अनंतकाळापर्यंत जिजाऊ आम्हा समस्त स्त्रीजातीसाठी दिशादर्शक असतील.

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !