कधीकधी मला 'पंधरा ऑगस्ट' आणि 'सव्वीस जानेवारी' या दोनच दिवस देशप्रेम जागृत असणाऱ्या लोकांचा देश आहे की काय.? अशी शंका यायला लागते. कारण या दिवशी रंगीबेरंगी स्वादिष्ट जिलेबी खात, डिपीवर तिरंगा झळवत आपण देशप्रेम दाखवत असतो.
पण नियमित कर भरणे, पर्यावरणाची काळजी, देशातील सार्वजनिक ठिकाणांची काळजी, लोकशाहीची जपणूक हे मात्र आम्ही करताना दिसत नाही. देशप्रेम तुमच्या रोमारोमात असायलाच हवे.. पण वेगवेगळ्या पक्षाचे गुलाम असलेल्या आपल्या पांगळ्या मानसिकतेला कोण काय करणार..?
घरातील कचरा झाडूच्या फटकार्याने स्वच्छ करता येतो, पण डोक्यात साठलेल्या कचर्याचं दुर्गंधीच व ढिगाचं काय.? उगाच एखादी घटना घडली की देशप्रेम उफाळून येतं. मग मोर्चे, दंगल करायला विधायक कार्य न करणाऱ्या विघातक हातांना भारी उत्साह येतो.!
देशातील सार्वजनिक संपत्ती जाळणे, फोडणे यात विकृत आनंद मिळतो. कितीतरी शहिदांनी आपले प्राण या आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिले. हजारो संसार उध्वस्त झाले. तेव्हाच १५ ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. २६ जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो.. त्यामागचा इतिहास आपण पाहू..
ब्रिटिशांनी डिसेंबर १९२९ ला भारत सार्वभौम स्वतंत्र राष्ट्र बनण्यास सशक्त नाही, असे जाहिर केले. याचा स्वातंत्र्य लढ्यातील सेनानींना खूपच राग आला. त्यांनी पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या नेतृत्वाखाली २६ जानेवारी १९३० ला 'रावी' नदीच्या तिरावर ध्वजारोहण केले. यासाठी त्यांच्यावर लाठीमार झाला त्यांना तुरुंगात टाकले.
१५ ऑगस्टला स्वातंत्र्य मिळाले. नंतर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशांसाठी संविधान तयार केले. ते अंमलात आणण्यासाठी पहिल्या ध्वजारोहण दिवसाची आठवण म्हणूनच २६ जानेवारी १९५० हा दिवस आपला प्रजासत्ताक दिन म्हणून निवडण्यात आला. २६ जानेवारी १९५० ला सकाळी १०:१८ वाजता भारत प्रजासत्ताक बनला.
त्यानंतर सहा मिनिटांनी राजेंद्र प्रसाद यांनी १०:२४ ला भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. आपल्या स्वातंत्र्य सेनानींचे योगदान आपण विसरता कामा नये. देशप्रेम ही भावना २४ तास १२ महिने आपल्यात जागृत राहिल तेव्हाच आपला देश महासत्ता होण्याच्या दिशेने पाऊलं टाकेल.
केवळ आपण भारतीय आहे असं म्हणून चालणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणं महत्त्वाचे आहे. लक्षात घ्या, कर्तव्यातील प्रामाणिक पणाला जास्त महत्त्व आहे. पार पाडण्याला नाही.
देशावर प्रेम करताना, आपण देशाशी, पर्यायाने आपल्या कामाशी प्रामाणिक आहोत का, याचा विचार आपल्यापैकी प्रत्येकाने दर क्षणी करायला हवा. अन्यथा 'पंधरा ऑगस्ट' आणि 'सव्वीस जानेवारी' या दिवसाचं 'वन डे' प्रेम होईल...
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)