अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीतील वकील दाम्पत्य आढाव यांची अमानुष हत्याकांडबाबत जाहीर निषेध होणे व चीड आणणे स्वाभाविकच आहे व सर्वांचीच हीच भावना असणार आहे. या दुर्दैवी प्रसंग निमित्ताने वकील संरक्षण कायदा होणेबाबत..
वकिलांवर वारंवार होणारे हल्ले लक्षात घेऊन वकील संरक्षण कायदा करण्यात यावा, अशी मागणी वकिलांकडून गेली अनेक वर्षे करण्यात येत होती. केंद्रीय कायदा विभागाने ही मागणी लक्षात घेऊन वकिलांसाठी संरक्षण कायद्याचा प्रस्ताव तयार केला असल्याचा चर्चा आहे परंतु यात पुढे कार्यवाही नाही.
शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, असे म्हणण्यात येत असले, तरी प्रत्येकाला दैनंदिन जीवनात कायद्याचा आधार घेऊन कामे करावी लागतात. लोकांच्या जीवनातील संघर्षाला, अन्यायाला, फसवणुकीला, गुन्हेगारी मोडून काढायला कायदाच मदतीला येतो.
लोकांचा न्यायव्यवस्थेवर असलेला हा विश्वास आहे आणि न्याय व्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक म्हणजे वकील आहे. त्यामुळे कोर्टाची पायरी चढताना वकिलाची मदत लागतेच.
भारतात स्वातंत्र्यपूर्व काळापासून वकिलांची भूमिका कायम महत्त्वाची राहिलेली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांमध्ये वकिलांचाही वाटा मोलाचा आहे. वकिली व्यवसायाकडे आदरपूर्वक पाहिले जाते. वकिलांच्या भूमिकांना कायम महत्त्व राहिले आहे.
न्याययंत्रणेमध्ये वकिलांची गरज कायम अधोरेखित होत असते. वकील म्हणजे 'ऑफिसर ऑफ दी कोर्ट'. कोर्टात दाखल होणाऱ्या खटल्यांमध्ये वकील कायद्याचा अभ्यास करून बाजू मांडतात. दोन्ही पक्षकारांच्या बाजूने लढत असलेले वकील कोर्टात विरुद्ध पक्षाचे मुद्दे खोडून काढतात.
खटला चालविण्याची प्रक्रिया वकील पूर्ण करतात. खटला चालविताना आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडतात. यात दुखावलेला, रागावलेला पक्षकार थेट वकिलांनाच धमकी देतो. 'दोन पक्षकारांच्या भांडणात वकील त्यांची बाजू मांडतो. एक पक्ष खटला हरणार तर एक जिंकणार असतो.
पण अनेकदा पक्षकार वकिलांवरच राग काढतात. अशा अनेक घटना घडल्या आहेत. गैरसमजुतीमधून वकिलांवर हल्ले होतात. वकिलांविरुद्ध काही तक्रार असल्यास त्यांची तक्रार करण्यासाठी बार कौन्सिल आहे. कोर्टाच्या आवारात, भर कोर्टात वकिलांवर हल्ला करतात.
गुन्हेगार, दहशतवाद्यांच्या बाजूने लढतानाही अनेक वकिलांना अशा प्रकारच्या धमक्या आणि हल्ल्यांना सामोरे जावे लागते. कायद्याचे संरक्षण करणाऱ्या वकिलांनाच संरक्षण नाही. त्यामुळे वकिलांना संरक्षण मिळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे वकिलांवर हल्ले होत राहिले तर न्याययंत्रणा कोलमडून पडेल.
समाजहितासाठी, न्यायासाठी वकील संरक्षण कायदा आवश्यक आहे. ज्याप्रमाणे पोलिसांबरोबर हुज्जत घातल्यास किंवा त्यांना त्रास दिल्यास सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल केला जातो. तसे संरक्षण वकिलांनाही दिले गेले पाहिजे. या कायद्यामुळे त्यांना मिळणार असून त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर नक्कीच जरब बसेल.
वकिलांबाबत काही चुकीचे घडत असेल तर त्यांना संरक्षण देणारी यंत्रणा असणेही आवश्यक आहे. मुख्य म्हणजे वकिलांना निर्भयपणे काम करता येईल, असे वातावरण असणेही आवश्यक आहे. त्यांना संरक्षण मिळाल्यास आणखी चांगल्या पद्धतीने काम करता येईल.
या दुर्दैवी हत्याकांड निमित्ताने पुढील मुद्दा काही वकिलांना पटणार नाही परंतु त्याबाबतही बोलणे आवश्यक आहे . अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. यामुळे कुणाच्या भावना दुखावणारा असतील तर मी आधीच माफी मागतो. आपण वकिलांनी सुद्धा समाजभान राखणे अत्यंत गरजेचे आहे.
राहुरी येथील वकील दांपत्याच्या हत्याकांडातील दोन आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. वकील म्हणून आपण अशा सराईत गुन्हेगारांचे वकीलपत्र घेतले पाहिजे का, हा सर्व बुद्धीने आत्मपरीक्षणाचा विषय आहे.
आपण कितीही क्रूर वागलो व सराईत गुन्हे केले तरी आपणास वाचवण्यासाठी वकील असतात हा सराईत गुन्हेगारांच्या झालेला दृढ समज याला आपणासच छेद द्यावा लागेल.
- ऍड. श्याम आसावा (अहमदनगर)