अहमदनगर - शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी १८ जानेवारी रोजी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिले आहे.
स्वतंत्र भारत पक्षाचे म्हणणे आहे की, महाराष्ट्रातील शेतकरी वर्गावर अत्यंत बिकट प्रसंग आलेला आहे. एकीकडे शेती व्यवसायावर दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट सारख्या नैसर्गिक आपत्ती कोसळत आहेत.
तर दुसरीकडे सरकार निर्यातबंदी, साठ्यांवर मर्यादा, वायदे बंदी, बेसुमार आयती करून शेतीमालाचे भाव पाडत आहे. परिणामी शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याऐवजी सरकार भीक दिल्यासारखे किरकोळ कर्जमाफी देत आहे.
शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. परंतू सत्तेत आलेल्या कोणत्याही पक्षाने या समस्या सोडविण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत. शेतीसाठी वीज पुरवठा, पीक विमा, वन्य प्राण्यांमुळे होणारे पिकांचे नुकसान, असे अनेक प्रश्न अनेक दशकांपासून प्रलंबित आहेत.
सर्व शेतमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी व शेतमाल व्यापारातील सरकारचा हस्तक्षेप कायमचा बंद करावा. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. म्हणून सक्तीची कर्जवसुली बंद करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी.
शेतीसाठी पूर्णवेळ व पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा. वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या शेतातील पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने उपाय करावेत किंवा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी.
पीक विम्यात होणारी शेतकऱ्यांची फसवणूक बंद करून विम्याचा योग्य लाभ देणारी योजना आमलात आणावी या मागण्या आहेत. त्यासाठी १८ जानेवारी २०२४ रोजी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत शेतकरी धरणे आंदोलन करतील.
आंदोलन लोकशाही मार्गाने व शांततेत होईल. शेतकऱ्यांच्या वरील मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे राज्यव्यापी धरणे आंदोलन असल्याचे घनवट यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांनी धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अनिल घनवट, पक्षाचे जिल्हाध्यक्ष, निलेश शेडगे, शेतकरी संघटनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष मधुकर शिंदे, नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष विक्रम शेळके व सर्व तालुकाध्यक्षांनी केले आहे.