भाईंचा विकास आराखडा... बुजलेले ओढे... अन् विकाऊ मतदार


१९७२ साली अहमदनगर शहराचा विकास आराखडा तयार करण्यासाठीं सरकारला १२ वर्षे लागली. त्यावेळी नवनीतभाई बार्शीकर अहमदनगर नगर पालिकेचे नगराध्यक्ष होते. शहराचा आराखडा (प्लॅन ) करण्याचं काम करणारे अधिकारी, कर्मचारी शासकीय विश्राम गृह येथे असायचे.

आपले काम करताना जेवण करायला जातानाही कर्मचारी खोलीच्या दरवाजाला कुलूप लावल्यावर दरवाजा सिल करायचे इतकी गुप्तता होती. नवनीतभाईंनी शहराच्या भविष्यातील हितासाठी या कामी जातीने लक्ष घातले होते.

भाई या संदर्भात संबंधितांशी वारंवार चर्चा करीत असत व आराखडा शहर हिताच्या दृष्टीने कसा अधिक चांगला होईल याचाच त्यांचा विचार असे. म्हणूनच प्रोफेसर कॉलनी, कुष्ठधाम रोड, हडको आदीच्या समावेशा बरोबर सावेडी उपनगर निर्माण झाले.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हडको प्रकल्पासाठी जागा आरक्षित झाली. आज प्रेमदान हडको जे निर्माण झाले ती भाईंची देण आहे. नवनीतभाई या कामात स्वतःला झोकून देत असताना  दररोज रात्री १२-१ वाजता झोपत असत अन् पहाटे लवकर उठत. आपल्या मनात भाई विषयी कायमचं कृतज्ञता हवी.

नाहीतर आज जपलेले, झुळझुळ वाहणारे ओढे बुजवून शहराला धोक्यात घालून करोडो कमवायचा धंदा सुरु झाला आहे, तेही इथल्या सर्व पक्षीय राजकारण्यांचा.. कुंपणच शेत खायला लागलं तर अशीच अवस्था होईल या उपनगराची...

तुम्ही घ्या नोटा अन् द्या यांना महापालिकेत मते.. एक लक्षात असू द्या, सावेडी भागातील हे विविध ओढे बूजवून यांनी करोडो रुपये कमावले आहेत.

उद्या भविष्यात चार - पाच तास सांगली, कोल्हापूर सारखा धोधो पाऊस झाला अन् तुमच्या आमच्या मुलांच्या, नातवंडांच्या नाकातोंडात पाणी जायला लागलं झाला तर त्याला दुसरं तिसरं कोणी जबाबदार नाही तर तुम्ही आम्हीच जबाबदार राहू हे लक्षात ठेवा..

महापालिकेच्या निवडणुकीत चार पाचशे रुपयांच्या अमिषासाठी काहींनी स्वतःच अमूल्य मत विकून शहराला खाईत घालण्याच मोठं पाप केलंय. शहराच्या उद्याच्या भविष्यासाठी भाईंनी मनापासुन, अगदी हृदयापासून काम केलं...

म्हणूनच भाई एकाच वेळी शहराचे आमदार, नगरपालिकेचे नगराध्यक्ष, अर्बन बँकेचे चेअरमन झाले. नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी वॉर्ड राऊंड घेण्याची प्रथा महाराष्ट्रात प्रथम भाईंनी सुरु केली.

त्यांचेचं एक सवंगडी शशिकांत चंगेडे वयाच्या ७५ व्या वर्षीही शहरातील ओढे नाले वाचवण्यासाठी झटत आहेत, लढत आहेत..या योद्ध्याला मनापासुन सलाम..!

- जयंत येलुलकर (माजी नगरसेवक, अहमदनगर)

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !