गौरव पठाडे (अहमदनगर) - वंचित बहुजन समाजाला आपला विकास साधायचा असेल तर येणाऱ्या लोकसभा, विधानसभा आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे रहा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडी राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण यांनी केले.
नगर तालुक्यातील आगडगाव येथे वंचित बहुजन आघाडी दक्षिण नगर तालुक्यातील आगडगाव येथे शाखेचे उद्घाटन चव्हाण व राज्य समन्वयक ॲड. अरुण जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा महासचिव योगेश साठे, तालुका अध्यक्ष मारुती पाटोळे,तालुका महासचिव रविकिरण जाधव, शहराध्यक्ष हनीफ शेख, बाबासाहेब धीवर, आगडगाव शाखाध्यक्ष हिरामण भिंगारदिवे आदी उपस्थित होते.
अरुण जाधव म्हणाले, महासचिव योगेश साठे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विविध गावात शाखा उघडण्यात येत आहेत. तालुक्याच्या वंचितच्या इतिहासात पहिल्या टप्यात तालुक्यात मोठया प्रमाणात गाव तेथे शाखा उघडली जात आहे. आता नगर तालुक्यात वंचितला राजकीय संजीवनी प्राप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आगडगाव येथील भैरवनाथाचे मंदिराला तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त करून दिला गेला पाहिजे त्यासाठी राज्य सरकारने विशेष निधी उपलब्ध करून गावाचा विकास केला पाहिजे. योगेश साठे म्हणाले, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय या मूल्यांची तत्वे जोपासून समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत हक्क आणि अधिकार देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध आहे.
प्रास्ताविक करताना रवींद्र शिरसाठ म्हणाले, वाढती महागाई, बेरोजगारी यामुळे सामान्य माणूस हतबल झाला आहे,शिक्षणाच्या पुरेशा सुविधा नाहीत त्यामुळे गुणवत्ता ढासळली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेला इमारत नाही त्यामुळे मुले अंगणवाडीच्या एकाच खोलीत सगळे बसतात. वंचित बहुजन समाजासाठी कसलेच भरीव काम नाही, त्यामुळे खाजगीकरण करणे मुठभर लोकांच्या फायद्याचं आहे.
नगर तालुकाध्यक्ष मारुती पाटोळे, बाबासाहेब धीवर, हिरामण भिंगारदिवे, अशोक भिंगारदिवे, अनिल पाडले आदींनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास आवर्जून पंचक्रोशीतील जेऊर, पिंपळगाव, रांजणी, कापुरवाडी, माथणी, कौडगाव, रतडगाव, देवगाव, खांडके यागावातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सूत्रसंचालन रवींद्र शिरसाठ यांनी केले आणि आभार सामाजिक कार्यकर्ते प्रमोद आढाव यांनी मानले.