जेव्हा मी 'बुधभूषण' जरा बारकाईने वाचत होते. छत्रपती संभाजी महाराज लिखित हा ग्रंथ. भाषा व्याकरण छंद अशा नीरस वाटणाऱ्या बाबी आणि विस्कळीत मांडणी अशा स्वरूपात मराठीत तो उपलब्ध आहेच. पण त्यातील गमती जमती, सौंदर्य आणि थोडे ऐतिहासिक संदर्भ पुढे आले नाहीत. अशीच एक गम्मत.
शंकराला आपण भोले, भोळा सांब म्हणतो. खरंच हा एकमात्र देव कुठे फसवाफसवी अगदी धर्मासाठीही करत नाही. सरळ मार्गी देव. म्हणून मी त्याला जिवलग समजते. असो.. पण 'बुधभूषण'मधे मात्र शंभूराजे शंकराला राजनीती तज्ञ म्हणतात.
मी हे वाचलं आणि विचारात पडले, की हा भोळा बाबा राजनीती तज्ञ कसा ? बरं शंभूराजे लिहितात तर त्याला आधार असणारच. आपली समज, वाचन कमी पडतंय याची जाणीव झाली. शोध सुरू केला.
संस्कृत मधील स्तुती, महिमा, सहस्त्रनाम असं बरंच वाचलं, पण शंकर 'राजनीतीज्ञ' कसा, हे काही सापडेना. बहुतेक आपण शंभूराजांनी ज्यांना हा ग्रंथ भूषण वाटेल त्या 'बुध' लोकांच्यात नाही असंही वाटलं. बुधभूषण सोबत शंभूराजांचे 'ब्रज साहित्य'ही अभ्यासात होते.
ते अभ्यासताना मला या कोड्याचं उत्तर सापडलं. एका शंभूराजांच्या समकालीन कवीने 'ब्रज'मधे लिहिलंय भोळा बाबा राजनीती तज्ञ कसा ते. आणि राजनीती, राजधर्म म्हणजे काय ते लिहिलं नाही. पण आपण ते सहज समजू शकतो.. ते लिखाण आज समकालीन वाटलं म्हणून मुळातील काव्य देते..
मूँस पर साँप राखें
साँप पर मोर राखें
बैल पर सिंह राखें
वाकै कहा भीत है
पूतन कुँ भूत राखें
भूत कूँ विभूत राखें रीत है
छहमुख कौं गजमुख
यहै बड़ी रीत है
काम पर वाम राखें
विष कूँ अमृत राखें
आग पर पानी राखें
सोई जगजीत है
देवीदास देख्य ग्यानी
शंकर की सावधानी
सब बात लायक पै
राखै राजनीति है
गणपतीचं वाहन उंदीर, शंकराच्या गळ्यातील साप आणि कार्तिकेय वाहन मोर, नंदी स्वतःचं वाहन तर पत्नीचं सिंह.. कंठात विष तर शिरावर चंद्रसोबत अमृत, भूत खेत त्याचा गण तर विभूती भूताना दूर ठेवणारी.. तृतीय नेत्र अग्नीयुक्त तर माथ्यावर शीतल गंगा..
हे सगळे स्वभावात: एकमेकाच्या विरूध्द, आणि अगदी शत्रू स्थानी असलेले घटक एकाच कुटुंबात सुखाने न भांडता एकत्र आनंदाने नांदवण्यासाठी जे करावं लागत ती म्हणजे राजनीती. आणि ते लिलया करतो म्हणून भोळा बाबा सर्वश्रेष्ठ राजनितीतज्ञ.
आज काल सगळी विविधता नष्ट करून एकसुरीपणा आणणारे लोक स्वार्थी म्हणावे लागतील. राजकारणी नव्हे. विरूध्द, विविध स्वभाव, गुण, संस्कृती असणाऱ्यांना कौशल्याने आनंदात एकत्र ठेवणे याला राजकारण म्हणावं.
शंभूराजे शंकराची स्तुती राजनिती तज्ञ म्हणून करतात तेंव्हा त्यांच्या राजकारणच सूत्रच ते मांडतात. बाकी जाऊ द्या. छत्रपती शंभू महाराज असामान्य बुद्धिमान होते, हे पुन्हा पुन्हा अधोरेखित होत जातं जसजसं त्यांचं लिखाण आपण वाचतो. तेंव्हा सर्वांनी बुधभूषण वाचायलाच हवा..!
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)