प्रिय ग्रेस,
तु म्हणायचा मी दुःखाचा महाकवी, तुझ्या लिखाणात, तुझ्या काव्यात पानोपानी दुःख भरलेले होते. जवळांच्याना महिती होते तुझे एकाकीपण. तुझ्या विक्षिप्त वर्तनात तु ते लपवत आलास..
पण तु चंद्र माधवीच्या प्रदेशात आम्हाला नेलंस, किती वेगळं आणि सुंदर तु लिहिलंस, तुझ्या आयुष्यात वियोग होता, तो आर्त किती सहजपणे तु चितारलास.. आईच्या जाण्यावर बऱ्याच जणांनी लिहिलंय, पण तुझी मांडणीच विलक्षण, तु गेली तेव्हा पाऊस निनादत होता.
तुझ्या दावणीला शब्द बांधलेले होते, तु सतत दुःख आणि मृत्यूगान करीत आलास, एक उदास गूढता होती तुझ्यात आणि तुझ्या लिखाणात. त्या जाणीवपूर्वक निर्मिलेल्या धुक्या पलीकडचा तु, समजला नाही रे आम्हाला..
पण ग्रेस, तुझ्यावर परमात्म्याचा ग्रेस होता. आणि तु खरा कवी होतास. तु जाऊन काळ लोटला, मी आज तुला श्रद्धांजली वाहतोय. तु काय बाबा, बसला असशील चंद्र माधवीच्या प्रदेशात.. अजुन काय लिहू ग्रेस.?
- शिरीष वीरकर (अहमदनगर)