बाजीरावांचे आयुष्य अवघं चाळीस वर्षांचे. तेही महालापेक्षा रणांगणावर जास्त राहिले. पण कवी, कथा, कांदबरीकार यांनी रंगवलेला बाजीराव मस्तानीच्या प्रेमात वेडा झालेला. रंगेल दाखवलाय, त्यामुळं पराक्रमी बाजीराव पेशव्यांचा पराक्रम झाकाळून गेलाय.
बुंदेलखंडाचे ककाजू महाराज उर्फ छत्रसाल महाराज यांची कन्या म्हणजे राजकन्या मस्तानी. शिवरायांच्या प्रेरणेने त्यांनी मोघलांविरुध्द दिलेला लढा ही त्यांच्या पराक्रमाची साक्ष होती. छत्रसाल हे हिंदू होते. पण त्यावेळी बुंदेलखंडापासून गुजरातपर्यंत प्रणामी नावाच्या पंथाची विचारधारा लोकप्रिय झाली होती.
या पंथात ईश्वर, अल्ला, कुराण.. गीता, पूजा, इबाबत सारे एकच मानले जाई. या पंथानुसार जातीभेद-धर्मभेद निषिद्ध होते. अर्थातच या गोष्टींचे अनुकरण मस्तानीही करत असणार. आई मुसलमान असली तरी ती एक कृष्णभक्त होती. अल्लाची इबाबत जेवढ्या निष्ठेनं ती करत असे. तेवढ्याच प्रेमानं ती कृष्णभक्ती करत असे.
छत्रसाल राजाच्या पत्नी वेगवेगळ्या जातीच्या होत्या. प्रत्येकीलाच आपल्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य होते. महमंद बंगश या पठाणाने ज्यावेळी बुंदेलखंडावर आक्रमण केले. छत्रसाल राजाचे वय झाले होते. त्यांनी बाजीराव पेशव्यांना पत्र लिहले आहे..
"जो गती ग्राह गजेंद्र की सो गत भई है. आज 'बाजी जात बुंदेलकी राखो बाजी लाज', हे कळताच बाजीराव तातडीने बुंदेलखंडास गेले. बंगशच्या कडव्या फौजेला पराभूत केले. छत्रसाल राजांची मुक्तता झाली, विजयोत्सव साजरा झाला.
छत्रसालराजाने या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपली सौंदर्यवती कन्या मस्तानीबरोबर विवाह करण्याची बाजीरावांना विनंती केली. तेव्हा बाजीराव तयार झालेले नव्हते. कारण त्यांचे काशीबाईशी लग्न झाले होते. नानासाहेब पेशवेंचा जन्म झालेला होता.
पण यामध्ये पिलाजीराव जाधव, मल्हारराव होळकर यांनी पुढील राजकीय हेतूने बाजीरावांना समजावले. बाजीरावांनीही विचार केला की आपलं लक्ष दिल्ली आहे. दिल्ली जिंकायची असेल तर बुंदेलखंडात आपली माणसं हवीत.
महाराष्ट्रातून दिल्लीच्या दिशेने फौज निघेल तेव्हा दिल्लीपर्यंत तिची दमछाक होईल. इथं जवळच फौज असेल तर उपयोग होईल हा विचार करुन सौंदर्यवती मस्तानीचा खांडा पध्दतीने विवाह झाला आणि मस्तानी पुण्यात आली.
मस्तानी अतिशय सुसंस्कृत, शाकाहारी, घरंदाज होती. (संदर्भ -पेशव्यांची बखर, भाऊसाहेबांची बखर) तिचे आणि प्रथमपत्नी काशीबाई यांचे सबंध सौदार्हपूर्ण होते. मस्तानी काशीबाईना ताई असे संबोधत असे, हे बाजीराव मस्तानी यांच्या पत्रव्यवहारावरुन दिसते.
काशीबाई, बाजीराव, मस्तानी या तिघांचा संसार म्हणजे परस्परांवरील अढळ विश्वासाचा तिपेडी गोफ होता. कारण मस्तानी बरोबरच्या विवाहानंतर काशीबाईना तीन मुले झाली. मस्तानीचा मुलगा कृष्णसिंग तथा समशेरबद्दाहर याचे मौजीबंधन पुण्यातील शास्त्री, पंडिताचा विरोध डावलून केले होते.
शनिवारवाडा बांधून झाल्यावर (इ.स.१७३२) झाल्यावर मस्तानी दिड, दोन वर्ष शनिवार वाड्यातच होती. नंतर शनिवारवाड्याच्या जवळच मस्तानी महल बांधला. त्यात ती तीन एक वर्ष आनंदाने राहिली असेल...पण बाजीरावांची आई राधाबाई, भाऊ चिमाजी पुढे नानासाहेब यांनी बाजीरावांपासून मस्तानीला अलग करायचा चंगच बांधला होता.
लग्न झाल्या झाल्या बाजीराव गुजरात मोहिमेवर गेले.. काही कारण नसताना राधाबाई आणि चिमाजी यांनी तिला नजरकैदेत ठेवले. राधाबाई अत्यंत धोरणी होती. मुळात तिला मस्तानीचे अस्तित्वच मान्यच नव्हते.
मस्तानी बाजीरावांच्या बरोबर ती शिकारीला जाई. ती अश्वारोहणात निपुन होती. युध्दकलेत प्रवीण होती. संगिताची भोक्ती होती. बाजीरावांचा अधूनमधून मिळणारा अल्प सहवास यातच ती आपलं जीवन घालवत होती.
बाजीराव या कटकारस्थानांनी नाराज होऊन आपले कुलदैवत करकुंभ्यास गेले. तेथून पाटसला जाऊन राहिले. इकडे चिमाजीनी मस्तानीला कैदेत टाकले. १४ नोव्हेंबर १७३९ रोजी घोड्यावर बसून निवडक लोकांना घेऊन मस्तानी पाटसास बाजीरावांकडे गेली.
पण चिमाजी, पुरंदरे, मोरोशेट यांनी समजूत घालून गोड बोलून पुण्यास आणले. अन तिला पेशव्यांचा तुरुंग असलेल्या कोथळा किंवा धनगड या दुर्गम किल्यात ठेवावे, असे ठरले. पण शंभूराजेचे पूत्र छत्रपतीं शाहुराजे छत्रपतीं असल्याने त्यांच्या परवानगीशिवाय तिला अटक करुन कैद्याची वागणूक देता येणार नव्हती.
चिमाजीनी अन नानासाहेब यांनीही शाहुराजेंना पत्र लिहिले की, नासिरजंगाच्या बरोबर युध्द करण्यास जाणेसाठी मस्तानीमुळे बाजीरावांचे दुर्लक्ष होत आहे. हे जानेवारीत घडतंय, पण वस्तुस्थिती अशी होती की, १२ डिसेंबर १७३९ रोजीच बाजीराव नासिरजंगाशी नेहमीच्या तडफेने लढत होता.
पण छत्रपती शाहूराजेंचे बाजीरावांशी स्नेहमयी सबंध असल्याने त्यांनी परवानगी नाकारली. बाजीराव नाराज होईल असे काही करु नये, असे नानासाहेबांनाच सांगितले. छत्रपतींचा बाजीराव आणि मस्तानी विषयक दृष्टिकोन समजंसपणाचा होता.
छत्रपतीं शाहुराजेंच्या मुळेच मस्तानीचे प्राण वाचले. पण तिला मस्तानी महलमध्येच अटक करुन ठेवण्यात आली. नासिरजंगाला हरवून कौटुंबिक कलहाने व्यथित बाजीरावांनी दूर खरगोण प्रांतातील रावेरखेडी येथे निघून गेला. चिमाजीला त्याने मस्तानीला इकडे पाठव अशी आज्ञा केली.
चिमाजीने मुद्दाम काशीबाईना आणि धाकट्या जनार्दनास रावेरखेडला पाठवले. या दरम्यान सततच्या लढाया, नर्मदेत सतत डुंबल्यामुळे बाजीराव तापाने आजारी पडले. ते आजारी पडल्याचे कळताच मस्तानी समशेरबद्दाहरला घेऊन रावेरखेडला निघाली.
ती पाबळपर्यंत पोहचली असेल २८ एप्रिल १७४० ला बाजीरावाचे आकस्मिक निधन झाले. मस्तानीला हे दुःख सहन झाले नाही...! मस्तानीने कट्यार छातीत खूपसून किंवा विष खाऊन आत्महत्या केली.. आणि मस्तानी संपली....
पाबळ नावाच्या खेड्यात तिची समाधीखाली तिच्या अस्थि आहेत. त्याबरोबर तिला पडलेले काही प्रश्न तिच्यासोबतच माती होऊन गेलेत. मला स्वतःला वाटतं मस्तानीने पती म्हणून काया-वाचा या धर्मानं बाजीरावांची पत्नी म्हणून पत्नीधर्माचे पालन केले होते.
आपण वडिलांच्या जातीचे म्हणून ओळखले जातो. मग चिमाजी आणि राधाबाई यांनी मस्तानीला सतत असा का त्रास दिला असेल.? की तिची कृष्णभक्ति संगीत, नृत्य याची आवड याला इतिहासाने तिला नर्तकी म्हणून बदनाम का केलं असेल?
चिमाजींनी नानासाहेब केवळ अठरा वर्षाचे युवक असताना त्यांचे अन मस्तानीचे सबंध आहेत, अशी अफवा उठविण्याचे कारस्थान केले. त्यावेळी मात्र मस्तानी आपल्या चारित्र्याबद्दल काही ऐकून घेत नाही. नानासाहेबांना खडसावले.
काशीबाईना लिहिलेल्या एका पत्रात उल्लेख आहे. पण आपलाच मुलगा आहे म्हणून माफही केलंय. वडिलांनी एक राजकीय तडजोड म्हणून केलेला विवाह... मस्तानीने मनापासून स्विकारला...
भारतात काय किंवा कुठं काय, राजकारणाचे सत्ता राखण्यासाठी, प्रतिष्ठेपायी अशा कितीतरी सुंदर मस्तानी विवाहवेदीवर चढल्या असतील. ही मस्तानीची गोष्ट इथच संपत नाही... बाईपणाचं हे ओझं ती ओठ मिटून सहन करते..
घरासाठी, प्रेमासाठी, प्रतिष्ठेपायी, आत्मसन्मानासाठी.. तिच्या जिवापाड केलेल्या प्रेमाची बूज राखण्यासाठी ती तोंड उघडत नाही. स्त्रीच्या स्वातंत्र्याचे वारे सगळीकडे वाहत आहे. त्यालाही चाळीस एक वर्ष होतील...
पण अजूनही सोशिकपणा हीच इथल्या बाईची खूण राहिली आहे. काळ बदलू देत, चेहरा बदलू देत.. पण बाईचं सोसणं तिथचं आणि तसंच आहे.
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)