घटस्थापना : कृषी आधारित वैज्ञानिक संकल्पना


आज घटस्थापना यावर एक नजर टाकणार आहोत. बिजपरिक्षण, पाणी परिक्षण, माती परिक्षण, आणी हवामान परिक्षणाची बौद्ध कालीन कृषि परंपरेची चिकित्सा पध्द्ती.

घटस्थापना ही कृषि आधारित वैज्ञानिक संकल्पना कृषिप्रधान परंपरेचा पुरस्कर्ता, महान राजा म्हणजे बळीराजाने निर्माण केलेली बियाणे, माती, पाणी आणी हवामानाची चिकित्सा करणारी पारंपारिक परंतु शास्त्रीय दृष्टीकोण असणारी पद्धती आहे.

घटस्थापना करतो म्हणजे आम्ही नक्की काय करतो.? प्रथमता एक पळसाच्या पानाची पत्रावळी ठेवली जाते. त्यावर शेतातील काळी माती ठेवली जाते. या मातीत विविध प्रकारचे बियाणे मिसळले जाते. त्यावर एक कच्च्या मातीचा घट ठेवला जातो.

या घटामध्ये नऊ दिवस रोज पाणी घातले जाते. नवव्या दिवशी तळी उचलुन घटाचे विसर्जन केले जाते. आता या प्रक्रियेतील शास्त्रीय चिकित्सा पाहुयात. घटस्थापना ही पावसाळ्याच्या शेवटच्या दिवसात आणी रब्बी पिकांचा हंगाम सुरु होण्याआधी केली जाते.

घटासाठी वापरण्यात येणारी माती ही शेतातील काळी माती वापरली जाते. परंतु ही माती इतर कोणाच्या शेतातील घेतली जात नाही तर शेतकरी आपल्याच शेतातील किंबहुना ज्या शेतात तो रब्बी पिक घेणार आहे त्याच शेतातील माती वापरली जाते.

कारण ज्या शेतात तो पिक घेणार आहे, त्या शेतातील मातीचे हे परिक्षण असते. या मातीत मिसळलेले बियाणे हे कोणतेही बियाणे वापरले जात नाही, तर रब्बी हंगामात जे पिक शेतकरी त्याच्या शेतात  पेरु शकतो व त्याच्याकडे उपलब्ध असणारे बियाणेच शेतात टाकले जाते.

त्यामागचा हेतु त्याच्या शेतात वापरले जाणाऱ्या बियाणाची उगवण क्षमता किती आहे हे तपासणे असते. घटामध्ये नऊ दिवस जे पाणी घातले जाते ते कुठलेही वापरले जात नाही. तर शेतकरी त्याच्या शेतासाठी ज्या जलस्त्रोत्राचे पाणी वापरणार आहे, त्याच जलस्त्रोत्राचे पाणी घटामध्ये घातले जाते.

घट हा मातीचा आणि कच्चा भाजलेलाच वापरला जातो. तो इतर कोणत्याही धातुचा वापरायचा नसतो. कारण घटामध्ये ओतलेले पाणी सतत पाझरणे आवश्यक असते. जेणेकरुन त्याच्या खाली शंकु आकारात ठेवलेल्या मातीत  आणि त्यात टाकलेल्या बियांना रुजण्यासाठी त्याची उपलब्धता होते.

घट नऊ दिवसच का बसवला जातो, त्याचे कारण बियांना रुजुन अंकुर बाहेर पडण्यासाठी आठ दिवसाचा कालावधी लागतो. घटामधील बियाणांची उगवणक्षमता रोज तपासली जाते. परंतु नवव्या दिवशी शेजारील पाच व्यक्तींकडून तळी उचलली जाते. म्हणजे घटामध्ये उगवून आलेल्या पिकाची पहाणी केली जाते.

जे पिक जोमाने आले आहे ते पिक शेतात पेरण्यासाठी सर्वानुमते निवडले जाते. या सर्वानुमते घेतलेल्या निर्णायाला चांगभल, येळकोट अशा घोषणा देवून सर्व मान्यता दिली जाते. सर्वमान्य असलेले पिक उदो उदो करुन उपटले जाते.

या उपटलेल्या पिकाचा तुरा शेतकरी आपल्या टोपी किंवा फेट्याच्या शिरपेचात खोचतो किंवा त्याची अंगठी करुन हातातही बांधली जाते. त्यामुळे घरोघरी घेण्यात आलेल्या परिक्षणाचे निकाल एकत्र करुन अभ्यासणे सोपे जाते.

गावातील सार्वजनिक ठिकाणी एकत्र येवून त्याच दिवशी गाव शिवारातील पिक पाण्याचे नियोजन केले जाते. या सर्व प्रक्रियेत माती, पाणी आणी बिज परिक्षण जसे होते, त्याच बरोबर या वर्षीचे हवामान कोणत्या पिकाला पोषक आहे याचे पण परिक्षण केले जाते.

माझ्या शेताच्या मातीत, माझ्याकडे उपलब्ध असलेले बियाणे, माझ्या शेताला उपलब्ध असलेल्या पाण्यावर, या वर्षीचे हवामान कोणत्या पिकाला पोषक आहे, या सर्वांची चिकित्सा करुन जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी वापरण्यात येणारी पारंपारीक परंतु शास्त्रावर आधारलेल्या या चिकित्सा पध्दतीची जोपासणा केली जाते.

प्रत्येक बहुजन सण उत्सवाप्रमाणे याही उत्सवाची आणि उपासा-तापासाच्या नावाखाली रसातळाला जावू न देता तेवढ्याच शास्त्रीय (कृषक वैज्ञानिक) पध्दतीने जोपासणे गरजेचे आहे.

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
('पदार्थ, पक्वान्न, पर्यावरण' या पुस्तकातून साभार)

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !