छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली अवघी हयात जनतेच्या कल्याणासाठी घातली. छत्रपतींनी जेंव्हा निवडक मावळ्यांसह स्वराज्याचा प्रण केला तेंव्हा त्यांना चारही बाजूंनी मुघल, निजाम, कुतुबशाही या शत्रूंनी घेरले. एव्हढेच काय तर तत्कालीन काही फितूर मातब्बर मराठ्यांनी देखील छत्रपतींना विरोध केला. त्यांच्या या स्वराज्य स्थापनेच्या कामात अडथळा आणला. मात्र, दृढ निश्चय, विराट पराक्रमाच्या जोरावर न भूतो नि भविष्यती असं स्वराज्य स्थापन केलंच.
आज त्याच छत्रपतींच्या जरांगे पाटील या मावळ्याने मराठ्यांच्या न्यायासाठी, त्यांच्या आन, बान आणि शान साठी आरक्षणाचा लढा हाती घेतलाय. या पठ्याला सत्ताधारी राजकारणी चारही बाजूंनी घेरून कोंडी करू पहाताय. मात्र, छत्रपतींचा हा मावळा "सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है, देखना है जोर कितना बाजू ये कातील मै है", असं म्हणत सह्याद्री सारखा मैदानात उभा आहे अभेद्य. ना कुटुंब, ना जीवन - मरण अशी कुठलीही परवा न करता.
'राजकारण्यांचे कुटील डाव' : आपल्या समाज्याच्या भल्यासाठीची ही लढाई जरांगे पाटलांच्या जिवावर बेतत असताना राजकारणी मात्र त्यांचे कुटील डाव मांडण्यात व्यस्त आहेत. एव्हढेच काय राजकारणातील बड्या आसाम्या असणारे मराठा आमदार, खासदार देखील या लढवय्यास पाठींबा देणे तर सोडाच, पण या बाबत तोंडातून ' ब्र ' न काढता केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. काही फितूर मराठा नेत्यांनी तर जरांगे पाटलांच्या विरोधात आघाडीच उघडलीय. मात्र, परकियांपेक्षा स्वकियांचे हल्ले जास्त जिव्हारी लागतात हेच खरे.
मराठे हिशोब करणार : मात्र, आरक्षणाच्या मुद्याहून सुरू असलेल्या या लढ्यातील घटनाक्रम मराठे बारकाईने नजर ठेऊन पहात, अनुभवत आहेत. वर्षोनुवर्षे ज्या मराठा नेत्यांच्या झोळीत मतांचा जोगवा वाढून आमदार, खासदार, मंत्री बनवून त्यांना मातब्बर बनविले, तेच आज बेईमान निघाले, अशी भावना मराठा समाजाची झालीय..
वास्तविक समाजाच्या या लढ्यात मराठा नेत्यांनी नेतृत्वाची भुमिका घेत सरकारला जाब विचारायला हवा. मात्र, ते केवळ बघ्याची भूमिका घेत सरकारची लाचारी पत्करत असल्याचे दिसून येतेय. त्यामुळे मराठे तेतृत्व फितूर झालंय अशी भावना मराठी समाजाची झालीय. मात्र, ' हर एक का दिन आता है ' अशी खूणगाठ मनाशी बांधून समाज येणाऱ्या निवडणुकीत त्यांना धडा शिकविण्याचा निश्चय करून बसलाय.
आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील सरकारशी थेट लढा देत आहेत. मराठा आमदार, खासदार, मंत्री यांचा सहयोग लाभत नसला तरी मी लढणारच, हा पवित्रा घेत जरांगे पाटलांनी समाजासाठी आपला जीव धोक्यात घातलाय.
आपल्या राजकीय स्वार्थासाठी या प्रश्नबाबत आपल तोंड न उघडणारे मराठे नेते एकीकडे आणि समाजासाठी जीवाची बाजी लावणारे जरांगे पाटील एकीकडे. त्यांची ही निःसीम लढाई पाहून दस्तुर खुद्द छत्रपती शिवाजी महाराज म्हणत असतील, "शोभलात जरांगे पाटील... शोभलात".
- ऍड. उमेश अनपट
मुख्य संपादक (MBP Live24)