मणिपूर पेटलंय,
आंदोलनांनी थैमान घातलंय...
कळेना कुठं काय चाललंय..
बलात्कार कोवळ्या कळीवर
मदतीला कोणी नाही...
कळेना कुठं काय चाललंय....!
बापू, आज खरी गरज आहे तुमची
तुमच्या आधाराची....
शब्दांची...
घरात बाप हवा असतो आधाराला...
नौखालीला धावला होता,
दंगली थांबवायला...
बापू, तुम्ही जाऊन पंचाहत्तर वर्षे झाली
आज देश पेटलाय,
नाही कुणी विझवायला....
तुमच्या पदचिन्हावर चालून
मंडेला आफ्रिकेचे गांधी होतात,
मार्टिन ल्युथरना अमेरिकेचे गांधी
म्हणतात...!
जगातील १६४ देशात बापू तुमचे
पुतळे आहेत...!
माझ्या भारतात आज पित्याची गरज
आहे....
बापू, तुमचा आवाका कळला
नाहीच हो आम्हाला...!
पण बापू, आम्ही तुमची लेकरं आहोत..
तुम्हाला जेवढं विसरू ,
तेवढंच गर्तेत घसरु....
म्हणून बापू तुम्ही हवे आहात...
बाप म्हणून हवे आहात...
बापू आज तुम्ही हवे आहात....!
- स्वप्नजा घाटगे
संपादक : सखीसंपदा (कोल्हापूर)