अहमदनगर - विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना दिशा देणारे विज्ञान प्रदर्शन एक व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा उपयोग करावा व आपल्यासह देशाच्या प्रगतीत महत्त्वाचा वाटा उचलावा. विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कल्पनाशक्ती अशा प्रदर्शनातून विकसित होते, असे प्रतिपादन स्नेहबंध सोशल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी केले.
भिंगार येथील श्रीमती ॲबट मायादेवी गुरुदित्ताशाह हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाच्या उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक राज्यकर आयुक्त दत्तात्रय भिसे, प्राचार्य नरवडे व्ही. एल.,विज्ञान प्रदर्शन विभाग प्रमुख एस. पी. खंडागळे, विज्ञान शिक्षक एस. एम. डोईफोडे, एस. जी. घुगरकर, जी. एम. करवते, एस. एम. आस्वर, डी. आर. गायकवाड उपस्थित होते.
डॉ. शिंदे म्हणाले, आज विज्ञान खूप पुढे गेले आहे, मात्र विज्ञान ही दुधारी तलवार असल्याने विद्यार्थ्यांनी त्यातील चांगले ते घेऊन व वाईट सोडून आपली प्रगती करावी. या विज्ञान प्रदर्शन प्रतिकृतींचे उद्घाटन राज्यकर आयुक्त दत्तात्रय भिसे यांच्या हस्ते झाले.
इयत्ता ५ वी ते ७ वी व ८ वी ते १० वी अशा दोन गटात विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रतिकृती मांडल्या होत्या. प्राचार्य नरवडे यांनी प्रदर्शनाचा उद्देश स्पष्ट केला. हे विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांच्या दिवसभर रांगा लागल्या होत्या.