बाबासाहेब, तुम्ही एकदा म्हणाला होता, सामाजिक गुलामगिरीतून मुक्त केलंय तुम्हांला.. मानसिक गुलामगिरीतून तुम्ही स्वतः मुक्त करायचंय स्वतःला. पण आम्ही अजून जातधर्म कर्मकांड यातच अडकलोयं.. मरणाऱ्या त्या कोळीयासारखे...
वसंताचा सांगावा घेऊन येणाऱ्या चैत्र पालवीचा धर्म कोणता..? भर उन्हात अग्निशिखा डोईवर घेऊन उभं राहणाऱ्या गुलमोहराचा धर्म कोणता ? डोईवर शितलता देणारा चंद्र, मन मोहून टाकणारे निळे आकाश.... यांचे धर्म कोणते ? माझा धर्म पालवीचा, बहरण्याचा, विपरित परिस्थितीत फूलून येण्याचा...
हा धर्म ज्याला कळला त्यालाच खुणावते झाडाची हिरवाई, निळं आकाश. चंद्रोदय झाला नव्हता, अजूनही आकाश केसरी होते.. हा केसरी रंग माणुसकीचा...! पण बाबा, एकची धर्म जगाला प्रेम अर्पावा… हे सांगणारे गुरुजी… खरंतर हे वेगळं सांगायची गरजच नव्हती ...!
याची मशागत केलीय… आमच्या तुकोबाने.. ज्ञानोबांनी, बुध्दांनी, कबीरांनी, गांधीजींनी, महात्मा.फुलेंनी आणि तुम्ही...! म्हणून मंबाजी संपतोच संपतो. उरतो तो तुकोबा, ज्योतिबा, सावित्रीआई, आणि बाबा तुमचे विचार...
म्हणून चालतच रहायचं.. प्रेमाचा धर्म या साऱ्यांच्याच पुढे जात राहतो.. आपला गुरु निसर्गाने आशा सोडली नाही… बेमुर्वतखोर नियतीच्या छाताडावर पोपटी पालवी येत रहाते. म्हणून आशा सोडायची नाही. प्रेम वाटणं बंद नाहीच करायचं, चलोगे अकेले, कारवाँ बढता चलेगा… नही तो चल अकेला...!
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूरकर)