अहमदनगर - कोयत्याचा धाक दाखवून टपरी चालकाला लुटणाऱ्या सराईत आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहे. दि. २९ मे रोजी चेतना कॉलनी परिसरात ही घटना घडली होती. विश्वास गायकवाड (रा. एमआयडीसी) असे त्याचे नाव आहे.
याप्रकरणी नितीन सुधाकर गायकवाड (वय ३४, धंदा- पान स्टॉल, चेतना कॉलनी, नवनागापुर) यांनी फिर्याद दिली होती. ते साई पान स्टॉल चेतना कॉलनी येथे पान विक्री करत असताना रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दोन आरोपीनी हातात कोयता व गुप्ती घेवुन त्याचा धाक दाखवला.
गायकवाड यांच्या पान स्टॉल गल्यातील दोन हजार रुपये बळजबरीने काढुन चोरुन नेले. या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांना आरोपींची गोपनिय माहिती मिळाली.
हा गुन्हा सराईत आरोपी शुभम उर्फ छब्या रविंद्र गायकवाड (वय २०, रा. फोर्जिंग कॉलनी, वडगाव गुप्ता शिवार) व विश्वास गायकवाड (रा. एमआयडीसी, अहमदनगर) यांनी केला आहे, असे त्यांना समजले. त्यानुसार सानप यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पथक तयार करुन गायकवाड याला पकडले.
त्याची विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. विश्वास गायकवाड याच्यावर एमआयडीसी, तोफखाना व नगर तालुका पोलिस स्टेशनमध्ये दरोडा, महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम, जबरी चोरी, आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश चाहेर, तसेच संदीप चव्हाण, पोलिस नाईक राजु सुद्रीक, विशाल थोरात, भागवत, सचिन हरदास, किशोर जाधव, उमेश शेरकर यांचे पथकाने केली आहे.