सत्ता आमचीच येणार, पण शहरात कोणते दिवे लागणार ?

सत्ता आमचीच येणार 
हो, सत्ता मात्र आमचीच येणार.. 
अहो साहेब,
मग शहरात कोणते असे दिवे लागणार...?


कितीतरी वर्ष ऐकतोय,
वाचतोय अशा बातम्या,
अशी भाषणे,
आम्ही नगरकर...
स्वाभिमान,सन्मान हरवला आहे 
आम्हा नगरकरांचा... 

पण सत्ता आमचीच येणार,
शहर आम्ही लुटणार,
जनतेचा, त्यांच्या प्रश्नांचा,
तसा आमचा काय संबंध..?
पण सत्ता आमचीच येणार..

गटारी बाहेर वाहू द्या, 
कचरा रस्त्यावर पडलेला असू द्या
शहराचे सारे रस्ते ब्लॉक होऊ द्या 
रस्त्यांचे खड्डे होऊ द्या...
रस्त्यांऐवजी खड्ड्यांचे टेंडर निघाले
तरी सत्ता आमचीच येणार...

विकास आम्हीच करणार
विकास आमचाच होणार 
राहिलेले ओढेसुद्धा आम्हीच बुजवणार..
म्हणून शहर गाडण्यासाठी
सत्ता आमचीच येणार...

शहराचा विकास होणार
पोरं जन्मलं, शाळेत गेलं,
कॉलेजला शिकलं 
पोट भरायला काम धंदा करू लागलं 
त्याचं लग्न झालं,
सोन्यासारखं बाळ जन्माला आलं..

तरीही,
काळजी करू नका 
विकास होणार आहे...
पण सत्ता मात्र आमचीच येणार..

पूर्ण बहुमताने येणार...
आणि तुम्ही सगळे टाळ्या वाजवत
आमची आरती ओवाळणार ...!

- जयंत येलुलकर, (अहमदनगर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !