कालचा दिवस अत्यंत अस्वस्थतेत गेला. सकाळ नितिनजींच्या आत्महत्येच्या वार्तेने उजाडली... एका उमद्या माणसाची अखेर अशी व्हावी.
स्टुडिओच्या बाहेर पत्रकारांनी आपआपले अंदाज वर्तवायला सुरु केले होते. आपल्या चॅनेलचा टीआरपी वाढविण्यासाठीची ही कसरत अतिशय किळसवाणी होत होती..
मन विषण्ण झालं... त्याचं कर्ज, कोविडच्या काळात रिकामा पडलेला स्टुडिओ आणि कर्जाचा डोंगर...! गेलेल्या माणसाबद्दल किती माहिती असते का केवळ एका घटनेवर आपण त्याच मुल्यमापन करणार आहोत.
आपण त्या व्यक्तींच्या आयुष्याचा भागही नसतो. पण आपण आपल्या मनानेच खोल नित्कर्ष काढून रिकामे होतो. अतिशय मोठा कलाकार, तीन वेळा राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त झालेले, कितीतरी चित्रपटांचे स्टेज आपल्या कल्पकतेने उभे करणारे नितिनजी अचानक गेले.
जाण्याआधी ते कित्तीवेळा तरी गेले असतील.. अपमानाने अर्धमेले झाले असतील... मागे एका चॅनेलवर त्यांना घळाघळा अश्रुपात करताना पाहिलंय.. एका हळव्या उमद्या मनाची अखेर अशी व्हावी.. नियतीने असं अकाली जाणं का लिहावं...!
आजचा समाज म्हणून आपण कुठंतरी कमी पडतोय, असं मला वाटतं. अपयश, दुःख पचवून पुन्हा उभं राहण्यात जीवनाची यशस्विता आहे, हे शिकवण्यात समाज कमी पडतोय.
यशस्वी लोकांचे धडे, त्यांचा संघर्ष समाजासमोर आलाच पाहिजे, पण त्या यशाच्या आधी त्यांना आलेलं अपयश, त्या व्यक्तीचा संघर्षही सर्वांना माहित झालाच पाहिजे. त्यासाठी वेळीच बोललं पाहिजे, मन कुठतरी उघडं करायला हवं, आतल्या आत धुसमसणाऱ्या जखमा कधी दोर होऊन गळ्याशी लटकतील याचा नेम नाही.
कर्ज बुडवणारे बुडवतात, देश सोडतात, पळून जातात.. त्यांना अभयही मिळतं. पण चित्रपटसृष्टीतून अशा मराठी माणसांसाठी एकही हात मदतीसाठी पुढे आला नाही, हे आपलं दुर्दैवच..!
भारताच्या या आधुनिक विश्वकर्म्याला भावपूर्ण आदरांजली..! नितिनजी म्हणजे भव्य आणि उत्तुंग.. त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची ताकद मिळो.. आणि लालचवलेल्या मिडीयाला सुधारण्याची बुध्दी येवो...!
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)