माजी सैनिकाचा खून, सराईत गुन्हेगारासह पत्रकाराला पोलिस कोठडी


अहमदनगर - जमिनीच्या व्यवहार करण्याच्या वादातून एका माजी सैनिकाचा खून झाला आहे. त्याचा मृतदेह लोणी शिवारात टाकून आरोपी पळून गेले होते. मात्र पोलिसांनी काही तासांतच या प्रकरणाचा छडा लावत दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

यातील मुख्य आरोपी अहमदनगरमधून प्रकाशित होणाऱ्या एका सायंदैनिकाचा संपादक व मालक आहे. त्याचे नाव मनोज वासुमल मोतीयानी (वय ३३) व त्याचा साथीदार स्वामी प्रकाश गोसावी (वय २८, दोघे रा. सावेडीगाव, अशी आहेत. दोघांनाही अटक करण्यात आली असून ते सध्या पोलिस कोठडीत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मोतीयानी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द अहमदनगर जिल्ह्यात विनयभंग, अल्पवयीन मुलीस पळवून नेणे, खंडणीच्या उद्देशाने जीवे मारण्याची धमकी देणे, दुखापत करणे व जीवे मारण्याची धमकी देणे असे गंभीर स्वरुपाचे ६ गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली आहे.

माजी सैनिक विठ्ठल नारायण भोर (वय ४८, रा. गणेश चौक, बोल्हेगांव, ता. नगर) हे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने तोफखाना पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानंतर त्यांचा शोध सुरू झाला होता. दरम्यानच्या काळात लोणी (ता. राहाता) येथे एक अज्ञात मृतदेह आढळला होता.

मृतदेहावर जखमा असल्याने खून झाल्याचे दिसून येत होते. त्यामुळे पोलिसांनी कसून तपास सुरू केला. क्राईम ब्रँचचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने घटनास्थळी भेट दिली. तेथे एका चारचाकी वाहनाचे टायरचे ठसे दिसून आले.

तो मृतदेह भोर यांचा असल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी भोर यांच्या पत्नीकडे विचारपूस केली. तेव्हा त्यांचे मोतीयानीसोबत जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार असून त्यावरुन दोघात वाद झाल्याचे सांगितले. पोलिसांनी मोतीयानीचा शोध सुरू केला.

पण मोतीयानी हा त्याचा साथीदार स्वामी गोसावी याच्यासोबत कारमधून गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मध्य प्रदेशपर्यंत पाठलाग करत सेंधवा येथे दोघांना अटक केली. त्यांची विचारपूस केल्यावर या गुन्ह्याची उकल झाली, असे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले आहे.

विठ्ठल भोर व मनोज मोतीयानी यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार होता. २९ जुलैला निंबळकला जात असताना त्यांच्यात वाद झाला. त्यावरुन मनोज मोतीयानी याने साथीदार स्वामी गोसावी याच्या मदतीने भोर यांच्या छातीवर स्क्रु ड्रायव्हरने वार केला. त्यामुळे भोर यांचा मृत्यू झाला.

दोन्ही आरोपींनी त्यांचा मृतदेह गाडीतून तसाच पुढे नेला आणि लोणी गावाच्या शिवारात एका पेट्रोलपंपाजवळ फेकून दिला. मात्र पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपींचा छडा लावत त्यांना जेरबंद केले आहे. न्यायालयाने दोघांनाही ५ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास क्राईम ब्रँचचे पोलिस करीत आहेत.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !